म्हापसा : हडफडे येथील बर्च बाय रोमियो लेन या नाईट क्लब आग दुर्घटना प्रकरणातील संशयित आरोपी गौरव लुथरा, सौरभ लुथरा आणि अजय गुप्ता यांना १४ सप्टेंबर रोजी न्यायालयात आत्मसमर्पण करण्याचे आदेश म्हापसा अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाच्या न्यायाधिश द्विजपल पाटकर यांनी दिले आहेत.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय देण्यात आला आहे. आरोपींच्या वैद्यकीय उपचारांच्या कारणास्तव केलेल्या अर्जावर न्यायालयाने त्यांना आवश्यक दिलासाही दिला आहे.
यापूर्वी तिन्ही आरोपींना सत्र न्यायालयाने दिलेला जामीन गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयाने रद्द केला होता. उच्च न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात आरोपींनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान याचिका दाखल केली होती.
मात्र, ३१ ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली आणि दोन आठवड्यांच्या आत आत्मसमर्पण करण्याचे स्पष्ट निर्देश दिले होते. त्यानंतर आरोपींनी पुढील प्रक्रिया आणि निर्देशांसाठी म्हापसा अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता.
शुक्रवार, ११ रोजी न्यायालयातील सुनावणीवेळी आरोपींच्या वकिलांनी त्यांच्या वैद्यकीय गरजांचा दाखला देत दिलासा देण्याची विनंती केली. यावर न्यायालयाने त्यांची विनंती मान्य करत त्यांना १४ सप्टेंबर रोजी शरण येण्याचे निर्देश दिले.
दरम्यान, ६ डिसेंबर २०२५ रोजी हडफडे येथील बर्च बाय रोमियो लेन या नाईट क्लबला भीषण आग लागली होती. यामध्ये २५ नागरिकांचा होरपळून मृत्यू झाला होता तर सहाजण जखमी झाले होते. याप्रकरणी हणजूण पोलिसांनी गौरव लुथरा, सौरभ लुथरा व अजय गुप्ता यांच्यासह अधिकारी वर्गाला अटक केली होती.
हणजूण पोलिसांनी तपास पूर्ण करून न्यायालयात एकूण १३ जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले होते. त्यानंतर संशयितांचा जामीन अर्ज सत्र न्यायालयाने मंजूर केला होता. न्यायालयाच्या या आदेशाला राज्य सरकारने उच्च न्यायालयात आव्हान दिले असता न्यायालयाने त्यांचा जामीन रद्द केला होता. यावर सर्वोच्च न्यायालयानेही शिक्कामोर्तब करत संशयितांना शरण येण्याचे निर्देश दिले होते.


