‘डिजिटल अरेस्ट’ प्रकरणातील अटक बेकायदेशीर असल्याचा दावा

संशयिताकडून उच्च न्यायालयात याचिका : २० रोजी पुढील सुनावणी

Story: गोवन वार्ता। प्रतिनिधी |
just now
‘डिजिटल अरेस्ट’ प्रकरणातील अटक बेकायदेशीर असल्याचा दावा

पणजी : सासष्टी तालुक्यातील एका महिलेची २.६० कोटींची ‘डिजिटल अरेस्ट’द्वारे फसवणूक केल्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) अटक केलेले मुंबईस्थित वकील अॅड. राशेश भरतकुमार उपाध्याय ऊर्फ राशेश शहा यांनी आपल्या अटकेला आणि कोठडीला उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. आपली अटक बेकायदेशीर असल्याचा दावा करत त्यांनी गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर पुढील सुनावणी २० रोजी होणार आहे.
भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (ट्राय) आणि केंद्रीय अन्वेषण विभागाचे (सीबीआय) अधिकारी असल्याचे भासवून तसेच मनी लाँड्रिंग प्रकरणात सहभाग असल्याचे सांगून सासष्टीतील एका महिलेची २.६० कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली होती. या प्रकरणी गोवा पोलिसांच्या सायबर विभागाने गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर ईडीनेही या प्रकरणाची चौकशी सुरू केली.
तपासादरम्यान ईडीने मुख्य संशयित फहीम मोईन हुसेन सय्यद, नईम मुईन सय्यद यांच्यासह चार्टर्ड अकाउंटंट भूषण मोये, शैलेश चव्हाण, विलास पवार आणि हवाला एजंट मुकेश कुमार पुखराज जैन ऊर्फ मुकेश भाई अशा सहा जणांना अटक केली होती.दरम्यान ईडीने २४ ऑक्टोबर रोजी पहाटेच्या सुमारास मुंबई विमानतळावरील बोर्डिंग गेटवर सीमाशुल्क विभाग आणि सीआयएसएफच्या मदतीने संशयित अॅड. उपाध्यायला गजाआड केले. तो दिल्लीला पळून जाण्याच्या प्रयत्नात होता. त्यानंतर संशयिताला मेरशी येथील उत्तर गोवा विशेष (पीएमएलए) न्यायालयात हजर करण्यात आला.
अटकेनंतर त्याला मेरशी येथील उत्तर गोवा विशेष पीएमएलए न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने प्रथम त्याला पाच दिवसांची ईडी कोठडी सुनावली. त्यानंतर १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.
गोठवलेल्या खात्यांसाठी लाचेचा आरोप
तपासात अॅड. उपाध्याय हे सायबर फसवणुकीच्या नेटवर्कमधील महत्त्वाचे दुवा असून, सायबर फसवणुकीच्या तक्रारी दाखल झाल्यानंतर या नेटवर्कशी संबंधित काही बँक खाती गोठवण्यात आली होती. संबंधित अधिकाऱ्यांना लाच देऊन ही खाती पुन्हा सुरू करून घेण्याचे काम उपाध्याय करत असल्याचा आरोप ईडीने केला आहे. या पार्श्वभूमीवरच त्यांच्यावर कारवाई करण्यात आली होती.       

हेही वाचा
सर्व पहा