म्हापसा : येथील गांधी सर्कल जंक्शनजवळ वयोवृद्ध कार चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने चार गाड्या एकमेकांवर आदळल्या. अपघातात चारजण किरकोळ जखमी झाले. त्यातील दोघांवर जिल्हा इस्पितळात उपचार करण्यात आले. ट्रॅफिक सिग्नलवर थांबलेली वाहने या अपघातात सापडली.
अपघात शुक्रवार, ६ रोजी दुपारी २ वा. सुमारास घडला. कारचालक उदय लोटलीकर (६८, रा. म्हापसा) हे आपल्या कारने गिरीहून म्हापशाच्या दिशेने येत होते. गांधी सर्कलजवळ ट्रॅफिक सिग्नल पडला होता. त्यामुळे तिथे वाहने थांबली होती. लोटलीकर यांचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि गाडीने दुसऱ्या कारला मागून धडक दिली. त्यामुळे सदर गाडीची ठोकर समोरील दोन दुचाकींना बसली. अपघातात दोन्ही दुचाकीवरील चारजण गाडीसह रस्त्यावर कोसळले व जखमी झाले. यामध्ये एक ९ वर्षांची लहान मुलगी होती. अपघातामुळे काहीवेळ जंक्शनवर वाहतूक कोंडी झाली.
गाडी चालवत असताना आपल्याला अचानक भोवळ आल्यामुळे वाहनावरील ताबा सुटला आणि हा अपघात घडल्याचा दावा लोटलीकर यांनी केला. या धडकेत चारही वाहनांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, सुदैवाने कोणतीही मोठी जीवितहानी झाली नाही.
अपघातातील जखमींपैकी कांदोळी येथील दुचाकीस्वार बाप लेकीवर म्हापसा जिल्हा इस्पितळात उपचार करण्यात आले. तर, इतर दोघेजण प्राथमिक उपचार करण्याअगोदर घरी गेले. अपघाताचा पंचनामा म्हापसा पोलीस हवालदार केशव नाईक यांनी केला.


