पर्वरी कॅसिनो गोळीबारातील संशयित सतीश शिंदेची याचिका फेटाळली

अटकेची प्रक्रिया बेकायदेशीर असल्याचा दावा

Story: गोवन वार्ता। प्रतिनिधी |
3 hours ago
पर्वरी कॅसिनो गोळीबारातील संशयित सतीश शिंदेची याचिका फेटाळली

पणजी : पर्वरी येथील ‘निओ मॅजेस्टिक’ कॅसिनोचे संचालक श्रीनिवास नायक यांच्यावर झालेल्या गोळीबार प्रकरणातील संशयित सतीश शिंदे याने आपल्या अटकेला तसेच पाच दिवसांच्या पोलीस कोठडीच्या आदेशाला आव्हान देत गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ही याचिका न्यायालयाने फेटाळून लावली आहे. याबाबतचा आदेश न्या. आश्विन भोबे यांनी दिला.

पर्वरी येथे २८ ऑगस्ट रोजी रात्री ८ वाजून ४७ मिनिटांच्या सुमारास ‘निओ मॅजेस्टिक’ कॅसिनोचे संचालक श्रीनिवास नायक यांच्यावर गोळीबार करण्यात आला. या प्रकरणाची प्रथम चौकशी पर्वरी पोलिसांनी केली. त्यानंतर या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला. गुन्हा शाखेने मुख्य संशयित सतीश शिंदे, दोन्ही शूटर अर्पुथराज ऊर्फ अण्णा पुलराज नदार आणि बाबू ऊर्फ इसार अली याच्यासह काझू अलाउद्दीन शेख, इसरार अली अहमद, सूरज उपेंद्र आचार्य आणि पवन हरी सिंग सौर, गोपाळ नाईक आणि दीनानाथ त्रिलोकी कोरी या संशयितांना अटक करून कारवाई केली आहे.

याच दरम्यान संशयित सतीश शिंदे याला गुन्हा शाखेने अटक करून न्यायालयात हजर केले होते. त्यावेळी म्हापसा येथील प्रथमवर्ग न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. मात्र, पोलिसांनी केलेली अटकेची प्रक्रिया आणि कायदेशीर बाबी चुकीच्या असल्याचा दावा करत शिंदे याने गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

या प्रकरणी न्यायालयाने सर्वांची बाजू एेकून घेतल्यानंतर संशयित सतीश शिंदे याने आपल्या अटकेला तसेच पाच दिवसांच्या पोलीस कोठडीच्या आदेशाला आव्हान दिलेली याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावली.

श्रीनिवास नायक यांची हस्तक्षेप याचिका

कॅसिनोचे संचालक श्रीनिवास नायक यांनी हस्तक्षेप याचिका दाखल केली. त्यात त्यांनी याचिकेसंदर्भात कोणताही आदेश पारित झाल्यास त्याचा थेट परिणाम आपल्यावर होणार आहे. त्यामुळे नैसर्गिक न्याय तत्त्वानुसार कोणतीही सुनावणी घेण्यापूर्वी किंवा आदेश देण्यापूर्वी मूळ तक्रारदारांचे म्हणणे ऐकून घेणे अत्यंत आवश्यक असल्याची भूमिका या हस्तक्षेप अर्जाद्वारे मांडण्यात आली आहे. 

हेही वाचा
सर्व पहा