बायणा उड्डाणपुलावरील तीव्र वळणावर कार उलटली

चालकासह कुत्रा जखमी : कारवरील नियंत्रण सुटल्याने अपघात

Story: गोवन वार्ता। प्रतिनिधी |
01st November, 10:51 pm
बायणा उड्डाणपुलावरील तीव्र वळणावर कार उलटली

वास्को : बायणा येथील उड्डाणपुलावरील तीव्र वळण वाहनचालकांसाठी धोकादायक ठरत असून, रविवारी याच ठिकाणी आणखी एक अपघात घडला. वळणावरून जाताना स्विफ्ट कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार एका बाजूला कलंडली. या अपघातात चालकासह कारमधील कुत्राही जखमी झाला. या घटनेमुळे उड्डाणपुलावरील धोकादायक वळणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

चालक स्विफ्ट कार घेऊन बायणा उड्डाणपुलावरून जात होता. यावेळी पुलावरील तीव्र वळणावर कार नेत असताना अचानक त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे कार एका बाजूला कलंडून अपघात झाला. अपघातानंतर परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. या घटनेत चालकाला किरकोळ दुखापत झाली. त्याला तातडीने उपचारासाठी चिखली येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. कारमधील कुत्र्यालाही किरकोळ दुखापत झाली आहे.

अपघातानंतर चालकाला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, जखमी झालेला कुत्रा कारजवळच बसून होता. त्यामुळे घटनास्थळी उपस्थित असलेल्यांचे लक्ष त्याच्याकडे वेधले गेले. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अपघाताचा पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.

तीव्र वळणावर वारंवार अपघात

बायणा उड्डाणपुलावरील या तीव्र वळणावर यापूर्वीही अनेक अपघात घडले आहेत. विशेषतः वेगाने जाणाऱ्या वाहनचालकांना या वळणावरून वाहने नेताना धोका निर्माण होत असल्याचे वारंवार समोर आले आहे. रविवारी पुन्हा अपघात घडल्याने या ठिकाणच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. संभाव्य अपघात टाळण्यासाठी या धोकादायक वळणावर योग्य रस्ते सुरक्षा उपाययोजना आणि प्रतिबंधात्मक उपाय तातडीने करण्याची गरज व्यक्त होत आहे.

हेही वाचा
सर्व पहा