वास्को : बालरथ शाळेच्या बसमधील ३२ वर्षीय वाहकाने अनेक अल्पवयीन विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याचा आरोप असून, त्याच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. संबंधित वाहकाने गेल्या अनेक वर्षांपासून विद्यार्थिनींना अयोग्य पद्धतीने स्पर्श केल्याचा संशय आहे. पीडित विद्यार्थिनी पाचवी ते सातवीच्या वर्गात शिकत असल्याची माहिती समोर आली आहे.
शाळेत विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या समुपदेशन सत्रादरम्यान हा प्रकार उघडकीस आला. यावेळी काही विद्यार्थिनींनी समुपदेशकाकडे आपल्यासोबत घडलेल्या प्रकारांची माहिती दिली. त्यानंतर समुपदेशकांनी ही बाब शाळा प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. शाळा प्रशासनाने याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली.
हे कथित प्रकार वेर्णा पोलीस स्थानकाच्या हद्दीत घडल्याचे समोर आले आहे. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी संबंधित बस वाहकाविरोधात गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.


