केरी-पालये डोंगर पठारावरील महापाषाणी दगड. (निवृत्ती शिरोडकर)
पेडणे :
केरी-पालये येथील डोंगरपठारावर आढळलेल्या वैशिष्ट्यपूर्ण दगडी रचनांमुळे स्थानिक नागरिक आणि युवकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. एकावर एक रचून ठेवलेले मोठे दगड महापाषाणकालीन अवशेष असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर पुरातत्त्व खात्याने स्थळाची पाहणी करून शास्त्रीय अभ्यासाद्वारे या रचनांचे स्वरूप आणि ऐतिहासिक महत्त्व स्पष्ट करावे, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.
पर्यावरण अभ्यासक राजेंद्र केरकर यांच्या माहितीनुसार, पुण्यातील डेक्कन कॉलेजमध्ये पुरातत्त्वशास्त्राचे शिक्षण घेणारे अमेय चिंचवडेकर यांनी या परिसराला भेट दिली असता या रचना त्यांच्या निदर्शनास आल्या. त्या पुरातन असण्याची शक्यता असल्याने त्यांचा सखोल अभ्यास होणे आवश्यक आहे. पुरातत्त्व खात्याचे पथक या ठिकाणी येऊन पाहणी करेल, असे केरकर यांनी सांगितले.
केरी येथील स्थानिक युवक देवांग बाबरेकर आणि अन्य दोन युवकांनी प्रतिनिधीसोबत या स्थळाला भेट देऊन पाहणी केली. परिसरात फिरताना असे मोठे दगड यापूर्वीही अनेकदा दिसले होते; मात्र, त्यांचे संभाव्य पुरातत्त्वीय महत्त्व माहीत नव्हते, असे बाबरेकर यांनी सांगितले. इंग्रजी दैनिकातील वृत्त वाचल्यानंतर या रचनांविषयी अधिक उत्सुकता निर्माण झाल्याचेही त्यांनी नमूद केले.
दगडी रचना आढळलेला परिसर सपाट असून, पर्यटन हंगामात येथे पॅराग्लायडिंगसह अन्य पर्यटन उपक्रमांसाठी विदेशी पर्यटक येतात. त्यामुळे या स्थळाचे संभाव्य ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन वेळेत पाहणी आणि नोंद करणे आवश्यक असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
पुरातत्त्व खात्याने तज्ज्ञांमार्फत सर्वेक्षण करून दगडी रचनांचा काळ, स्वरूप आणि ऐतिहासिक संदर्भ निश्चित करावा. परिसरातील अन्य रचनांचेही दस्तऐवजीकरण करावे आणि त्यांचे पुरातत्त्वीय महत्त्व सिद्ध झाल्यास संरक्षणात्मक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिक व युवकांनी केली आहे. या रचना खरोखरच महापाषाणकालीन आहेत का, याबाबत शास्त्रीय निष्कर्षाची प्रतीक्षा आहे.
‘घुटनेचा देव’ परिसरात दगडी रचना
केरी-पालये पठारावरील ‘घुटनेचा देव’ परिसरात या वैशिष्ट्यपूर्ण दगडी रचना आढळतात. परिसरातील अन्य ठिकाणीही मोठमोठे दगड दिसून येतात. मात्र, यांपैकी कोणत्या रचना नैसर्गिक आहेत आणि कोणत्या मानवनिर्मित किंवा ऐतिहासिक महत्त्वाच्या आहेत, हे तज्ज्ञांच्या अभ्यासानंतरच स्पष्ट होणार आहे.


