उत्तर गोव्यातील मंदिरांच्या पायाभूत सुविधांसाठी ७.३३ कोटींची निविदा

‘एकादश तीर्थ यात्रे’अंतर्गत पर्यटन विकास महामंडळाचे साहाय्य

Story: गोवन वार्ता। प्रतिनिधी |
34 mins ago
उत्तर गोव्यातील मंदिरांच्या पायाभूत सुविधांसाठी ७.३३ कोटींची निविदा

पणजी : गोवा पर्यटन विकास महामंडळाने (जीटीडीसी) ‘एकादश तीर्थ यात्रा’ प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात समाविष्ट असलेल्या उत्तर गोव्यातील मंदिरांमध्ये पायाभूत सुविधा उभारण्यासाठी ७ कोटी ३४ लाख रुपयांची फेरनिविदा जारी केली आहे. जीएसटीसह या प्रकल्पाचा अंदाजित खर्च ७ कोटी ३३ लाख ६० हजार ८५७ रुपये असून, पावसाळ्याचा कालावधी वगळून २४० दिवसांत काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

एकादश तीर्थ यात्रा सर्किटमध्ये गोव्यातील ११ मंदिरांचा समावेश आहे. त्यापैकी उत्तर गोव्यातील खांडोळा येथील श्री महागणपती मंदिर, माशेल येथील श्री देवकीकृष्ण मंदिर, ब्रह्मकरमळी येथील श्री ब्रह्मदेव मंदिर, साखळी येथील श्री दत्त मंदिर आणि नार्वे येथील श्री सप्तकोटेश्वर मंदिर यांचा पहिल्या टप्प्यात समावेश आहे.

भाविकांसाठी आधुनिक सुविधा

प्रस्तावित प्रकल्पांतर्गत मंदिरांच्या प्रवेशद्वारांजवळ पाय धुण्यासाठी पाण्याची व्यवस्था, चप्पल स्टँड, लॉकर आणि दिव्यांगांसाठी सुलभ सुविधा उभारण्यात येणार आहेत. यामध्ये व्हीलचेअर तसेच दृष्टिहीन व्यक्तींना मार्गदर्शन करण्यासाठी स्पर्शज्ञानावर आधारित फरशांचा समावेश असेल. मंत्रजपासाठी ध्वनियंत्रणा, तसेच वाय-फाय, स्पीकर्स आणि अन्य उपकरणांनी सुसज्ज ई-किऑस्कही उभारण्यात येणार आहेत.

प्रकल्प व्यवस्थापनाची जबाबदारी खासगी कंपनीकडे

या प्रकल्पासाठी एपीआयसीईएस स्टुडिओ प्रायव्हेट लिमिटेडची वास्तुरचनाकार आणि प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. प्रकल्पाचे नियोजन, आराखडे तयार करणे, बांधकाम आणि विकासकामांच्या व्यवस्थापनाची जबाबदारी ही कंपनी सांभाळणार आहे. तसेच, प्रकल्पात सल्लागार अभियंता-प्रभारी म्हणूनही कंपनी काम करणार आहे.

निविदेच्या अटींनुसार, बांधकाम साहित्य, मजूर, वाहतूक, आवश्यक परवानग्या, तात्पुरत्या बांधकामाची व्यवस्था आणि कामाच्या ठिकाणची स्वच्छता यांचा खर्च कंत्राटदाराला आपल्या दरांमध्ये समाविष्ट करावा लागणार आहे. भूगर्भातील पाणी, भरती-ओहोटीचे पाणी किंवा पावसाचे पाणी काढण्याची व्यवस्थाही कंत्राटदाराला स्वतःच्या खर्चाने करावी लागेल. या कामांसाठी स्वतंत्र अतिरिक्त मोबदला दिला जाणार नाही.

निविदा मंजूर झाल्यानंतर सात दिवसांच्या आत कंत्राटदाराला बांधकामाचे वेळापत्रक सादर करावे लागेल. तसेच, दररोजच्या कामाच्या प्रगतीचा अहवाल देणे बंधनकारक असेल. कामादरम्यान लागू सुरक्षा नियम, पर्यावरणविषयक मार्गदर्शक तत्त्वे आणि बांधकाम साहित्याच्या गुणवत्तेसंबंधीच्या अटींचे पालन करणेही आवश्यक असेल.

प्रचारासाठी वेबसाइट, मोबाईल ॲप

तीर्थक्षेत्र पर्यटनाला चालना देण्यासाठी स्वतंत्र वेबसाइट, पोर्टल, मोबाइल ॲप्लिकेशन, छापील कॅटलॉग आणि माहितीपत्रके तयार करण्याचे प्रस्तावित आहे. याशिवाय, संपूर्ण मंदिर सर्किटचे ब्रँडिंग, दिशादर्शक फलक, माहिती फलक आणि पर्यटकांना वेगळा अनुभव देणाऱ्या सुविधांचाही प्रकल्पात समावेश आहे.

हेही वाचा
सर्व पहा