पणजी : गोव्यात २०२५-२६ या वर्षात भुईमुगाचे उत्पादन २३.१ टक्क्यांनी घटून ८४ टनांवर आले आहे. २०२४-२५ मध्ये भुईमुगाचे उत्पादन १११ टन होते. त्यात पुढील वर्षी २७ टनांची घट झाली आहे. पावसाळी आणि हिवाळी या दोन्ही हंगामांत लागवडीखालील क्षेत्र कमी झाल्याने उत्पादनावर परिणाम झाल्याची माहिती कृषी संचालनालयाने दिली आहे.
कृषी संचालनालयाच्या आकडेवारीनुसार, २०२४-२५ मध्ये भुईमुगाचे लागवडीखालील क्षेत्र ६१ हेक्टर होते. ते २०२५-२६ मध्ये ४८ हेक्टरवर आले. त्यामुळे लागवडीच्या क्षेत्रात २१.३ टक्क्यांची घट नोंद झाली. याच काळात उत्पादन १११ टनांवरून ८४ टनांपर्यंत घसरले. लागवडीखालील क्षेत्र आणि उत्पादन या दोन्हींमध्ये घट झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते.
पावसाळी हंगामातील उत्पादन निम्म्यावर
पावसाळी हंगामात उत्पादनात मोठी घट नोंदवण्यात आली. २०२४-२५ मध्ये ६ हेक्टर क्षेत्रात ११ टन भुईमुगाचे उत्पादन झाले होते. २०२५-२६ मध्ये लागवडीखालील क्षेत्र ४ हेक्टरवर आले, तर उत्पादन अवघे ५ टन झाले. त्यामुळे पावसाळी हंगामातील उत्पादनात ५४.५ टक्क्यांची घट झाली.
हिवाळी हंगामातही घसरण
गोव्यात भुईमुगाच्या एकूण उत्पादनात हिवाळी हंगामाचा मोठा वाटा आहे. मात्र, या हंगामातही उत्पादन घटले आहे. २०२४-२५ मध्ये ५५ हेक्टर क्षेत्रात १०० टन उत्पादन झाले होते. २०२५-२६ मध्ये लागवडीखालील क्षेत्र ४४ हेक्टरवर आले, तर उत्पादन ७९ टन झाले. त्यामुळे लागवडीच्या क्षेत्रात २० टक्के आणि उत्पादनात २१ टक्क्यांची घट झाली.
२०२३-२४ मध्ये हिवाळी हंगामात ५४ हेक्टर क्षेत्रात ८४ टन उत्पादन झाले होते. २०२४-२५ मध्ये लागवडीचे क्षेत्र ५५ हेक्टर झाले आणि उत्पादन १०० टनांपर्यंत वाढले. या काळात पावसाळी हंगामातील उत्पादन ११ टनांवर स्थिर होते.
तीन वर्षांच्या आकडेवारीतही घट
तीन वर्षांच्या एकूण आकडेवारीचा विचार करता, २०२३-२४ मध्ये ९५ टन असलेले भुईमुगाचे उत्पादन २०२५-२६ मध्ये ८४ टनांवर आले. त्यामुळे एकूण उत्पादनात ११.६ टक्क्यांची घट झाली. याच काळात लागवडीखालील एकूण क्षेत्र ६० हेक्टरवरून ४८ हेक्टरवर आले. म्हणजेच लागवडीच्या क्षेत्रात २० टक्क्यांची घट नोंदवण्यात आली.


