भाजप प्रभारी डॉ. भारती पवार पत्रकारांशी बोलताना. सोबत खासदार सदानंद शेट तानावडे, आमदार प्रवीण आर्लेकर व इतर. (निवृत्ती शिरोडकर)
पेडणे : देशात आणि राज्यात भाजप सरकारला पर्याय नसून, विकासासाठी गोमंतकीय आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपला बहुमताने पुन्हा सत्तेवर आणतील, असा विश्वास भाजपच्या गोवा प्रभारी डॉ. भारती पवार यांनी व्यक्त केला. आगामी काळात विधानसभेत महिला आमदारांचा सहभागही वाढेल, असे त्यांनी सांगितले.
पेडण्याच्या प्रसिद्ध कोजागिरी पुनव उत्सवानिमित्त देवदेवतांचे दर्शन घेण्यासाठी त्या आल्या होत्या. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी आगामी विधानसभा निवडणूक, महिलांचा राजकीय सहभाग आणि भाजपच्या विकासविषयक भूमिकेवर भाष्य केले.
भाजपने स्थानिक, राज्य आणि केंद्रीय पातळीवर महिलांना नेतृत्वाची संधी दिली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीतही पक्ष महिलांना प्राधान्य देईल, असा विश्वास डॉ. पवार यांनी व्यक्त केला. महिलांना राजकीय क्षेत्रात यशस्वी वाटचाल करता यावी, यासाठी पक्षाचे वरिष्ठ नेते विविध माध्यमांतून मार्गदर्शन करीत असल्याचे त्यांनी सांगितले.
देशसेवेसाठी महिला पुढे येत असल्याबद्दल समाधान व्यक्त करताना त्या म्हणाल्या, संधी मिळाल्यास महिला कोणत्याही क्षेत्रात मागे राहत नाहीत. त्यांच्या नेतृत्वगुणांना वाव मिळावा आणि निर्णयप्रक्रियेत त्यांचा सहभाग वाढावा, यासाठी भाजप प्रयत्नशील असल्याचे त्यांनी नमूद केले.
महिलांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार आणि मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकार विकासासाठी काम करीत असल्याचे डॉ. पवार यांनी सांगितले. जनहित आणि जनकल्याणासाठी भाजप सरकार सातत्याने कार्यरत असून, आगामी विधानसभा निवडणुकीत विकासाचा मुद्दा घेऊन पक्ष जनतेसमोर जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
माजी मुख्यमंत्री प्रा. पार्सेकर यांचे स्वागत
खासदार सदानंद शेट तानावडे यांना पत्रकारांनी माजी मुख्यमंत्री प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर यांचा भाजपमध्ये पुनर्प्रवेश होणार का, असा सवाल केला असता त्यांनी उत्तर देताना सांगितले त्याविषयी आपल्याला अजून काही माहीत नाही तारीख निश्चित झालेली नाही. परंतु, या पक्षामध्ये माजी मुख्यमंत्री प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर यांचे स्वागत असेल, असे त्यांनी स्पष्ट केले.
सलग चौथ्यांदा भाजपचे सरकार येणार : तानावडे
राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे यांनीही आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला. गोव्यात सलग चौथ्यांदा भाजपचे सरकार सत्तेवर येईल, असे त्यांनी सांगितले. भाजप सरकार गोवेकरांचे असून, जनतेच्या कल्याणासाठी काम करीत आहे. सरकारच्या कामगिरीच्या बळावर आगामी निवडणुकीत जनता पुन्हा भाजपला कौल देईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.


