१०० कोटींचे लाचप्रकरण; तामिळनाडूचे माजी शिक्षणमंत्री अनबिल महेशला अटक

१७७ खासगी शाळांच्या व्यवहारांची पोलिसांकडून चौकशी; सरकारी परवानग्यांच्या बदल्यात पैसे घेतल्याचा आरोप : तामिळनाडूतील कथित १०० कोटी रुपयांच्या खासगी शाळा मान्यता घोटाळ्याप्रकरणी माजी शालेय शिक्षणमंत्री आणि द्रमुकचे (DMK) नेते अनबिल महेश पोय्यामोझी यांना चेन्नई पोलिसांनी अटक केली आहे.

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
3 hours ago
१०० कोटींचे लाचप्रकरण; तामिळनाडूचे माजी शिक्षणमंत्री अनबिल महेशला अटक

चेन्नई : तामिळनाडूतील कथित १०० कोटी रुपयांच्या खासगी शाळा मान्यता घोटाळ्याप्रकरणी माजी शालेय शिक्षणमंत्री आणि द्रमुकचे (DMK) नेते अनबिल महेश पोय्यामोझी यांना चेन्नई पोलिसांनी अटक केली आहे. मद्रास उच्च न्यायालयाने (Madras High Court) त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर अमिंजिकाराई परिसरातील एका अपार्टमेंटमधून त्यांना ताब्यात घेण्यात आले.

द्रमुकच्या मागील सरकारच्या कार्यकाळात अनबिल महेश शालेय शिक्षणमंत्री असताना खासगी शाळांना सरकारी मान्यता, कायमस्वरूपी मान्यता आणि शाळांचा दर्जा वाढविण्यासाठी आवश्यक परवानग्या मिळवून देण्याच्या नावाखाली पैसे गोळा केल्याचा आरोप आहे. हे पैसे पक्षनिधीच्या नावाखाली घेतले जात असल्याचा दावाही तक्रारीत करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा तपास ग्रेटर चेन्नई पोलिसांच्या केंद्रीय गुन्हे शाखेकडून (सीसीबी) सुरू आहे. मद्रास उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती व्ही. लक्ष्मीनारायणन यांनी अनबिल महेश यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता.

तामिळनाडूतील खासगी शाळांच्या संघटनांच्या महासंघाचे सचिव डी. सी. इलंगोवन यांनी यासंदर्भात तक्रार दाखल केली होती. शाळा व्यवस्थापनांना कायमस्वरूपी मान्यता, शाळांचा दर्जा वाढविण्याची परवानगी, नगर व नगररचना संचालनालयाकडून (डीटीसीपी) मंजुरी तसेच अन्य सरकारी परवानग्या मिळवून देण्याचे आश्वासन देऊन पैसे घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. मात्र, काही शाळांना आश्वासन दिलेल्या परवानग्या मिळाल्या नाहीत आणि त्यांचे पैसेही परत करण्यात आले नाहीत, असे तक्रारदारांचे म्हणणे आहे.

१७७ खासगी शाळांच्या व्यवहारांची चौकशी

पोलिसांनी आतापर्यंत या कथित घोटाळ्यात पैसे दिल्याचा आरोप असलेल्या १७७ खासगी शाळांच्या व्यवहारांची तपासणी केली आहे. माजी द्रमुक प्रवक्ते बी. टी. अरसकुमार आणि माजी आमदार मुथुकुमार यांच्याही कथित सहभागाची चौकशी सुरू आहे. राजकीय प्रभाव आणि शिक्षण विभागातील संपर्क असल्याचे सांगून शाळा व्यवस्थापनांकडून पैसे गोळा केल्याचा त्यांच्यावर संशय आहे.

या प्रकरणातील एकूण आर्थिक व्यवहार १०० कोटी रुपयांपेक्षा अधिक असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. तामिळनाडूमधील आणखी किती संस्थांकडून अशा प्रकारे पैसे गोळा करण्यात आले, याचाही तपास सुरू आहे.


हेही वाचा
सर्व पहा