जयपूर : राजस्थानात शनिवार अपघातवार ठरला. जयपूर आणि चुरू जिल्ह्यात झालेल्या दोन भीषण अपघातांत एकूण दहा जणांचा मृत्यू झाला. चुरू जिल्ह्यात झालेल्या अपघातात काळाने एकाच कुटुंबातील पाचजणांवर घाला घातला तर एकूण सहाजण ठार झाले. (Saturday proves to be a day of accidents in Rajasthan; 10 people killed in two separate incidents. Five members of the same family lose their lives.) जयपूर जिल्ह्यातील अपघातात नाशिकच्या सटाणा तालुक्यातील चौघांचा मृत्यू झाला.
चुरू जिल्ह्यातील सादुलपूर भागात ददरेवा येथे भरधाव कारची धडक पुढे जात असलेल्या ट्रकला बसली. त्यात एकाच कुटुंबातील पाच जण व कार चालकाचा मृत्यू झाला. कारमधील सर्वजण तारानगरच्या सोमसीसर गावातील रहिवासी होते. गोगामेडी येथे दर्शनासाठी जात असताना हा अपघात झाला.
या भीषण अपघातात सात महिन्यांची लहान मुलगी गंभीर जखमी झाली आहे. तिला उपचारासाठी हॉस्पिटलात दाखल करण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. पोलीस पुढील तपास करीत आहेत. सोमसीसर गाव शोकसागरात बुडाला आहे.
बस अपघातात नाशिकमधील चार जणांचा मृत्यू
जयपूरमधील बागरू भागात शनिवारी पहाटे जयपूर ते अजमेर राष्ट्रीय महामार्गावर नाशिकच्या भाविकांना घेेऊन जाणारी एक बस ट्रेलरला धडकून झालेल्या अपघातात चार जण ठार झाले तर सात जण जखमी झाले आहेत. अपघातग्रस्त बसमधील भाविक खाटूश्यामजी मंदिराला भेट देऊन चित्तोडगड येथील सांवरिया सेठ मंदिराकडे जात होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहाटे दोनच्या सुमारास हा अपघात घडला. जखमींना जयपूरच्या सवाई मान सिंग रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बसमध्ये एकूण २८ प्रवासी होते. जखमींपैकी काहीजणांची प्रकृती गंभीर आहे.


