अमिताभ बच्चन यांचा ‘जलसा’ बंगला उडवण्याची धमकी; दिलजीत दोसांझचा कॉन्सर्टही निशाण्यावर

मुंबईच्या महापौर कार्यालयाला धमकीचा ई-मेल; महालक्ष्मी रेसकोर्सलाही लक्ष्य करण्याचा उल्लेख, पोलिसांकडून तपास सुरू : भिनेता टायगर श्रॉफवरील गोळीबाराच्या घटनेनंतर आता बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचा ‘जलसा’ बंगला बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. याशिवाय पंजाबी गायक दिलजीत दोसांझ यांच्या आगामी कॉन्सर्टमध्ये हल्ला करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
just now
अमिताभ बच्चन यांचा ‘जलसा’ बंगला उडवण्याची धमकी; दिलजीत दोसांझचा कॉन्सर्टही निशाण्यावर

मुंबई : अभिनेता टायगर श्रॉफवरील (Tiger Shroff) गोळीबाराच्या घटनेनंतर आता बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचा ‘जलसा’ बंगला बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात  आली आहे. याशिवाय पंजाबी गायक दिलजीत दोसांझ यांच्या आगामी कॉन्सर्टमध्ये हल्ला करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. या धमकीमुळे मुंबईतील सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या अधिकृत ई-मेल खात्यावर हा धमकीचा संदेश प्राप्त झाला. या ई-मेलमध्ये महापौर कार्यालय, सेलिब्रिटींची निवासस्थाने आणि काही शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. अमिताभ बच्चन यांच्या ‘जलसा’ बंगल्याचा त्यात स्पष्ट उल्लेख असून, ३१ ऑक्टोबर ते २७ नोव्हेंबर या कालावधीत कधीही हा बंगला उडवून देण्याचा दावा करण्यात आला आहे.

पंजाबी गायक दिलजीत दोसांझ यांच्या २७ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या कॉन्सर्टमध्येही हल्ला करण्याची धमकी देण्यात आली आहे. याशिवाय महालक्ष्मी रेसकोर्स, महापौर कार्यालय आणि तीन ते चार शाळांना लक्ष्य करण्याचा उल्लेख ई-मेलमध्ये आहे. ३१ ऑक्टोबर रोजी शाळांवर हल्ला करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

धमकीचा संदेश मिळाल्यानंतर बॉम्बशोधक व नाशक पथकाने महापौर कार्यालयाची तपासणी केली. पोलिसांनी संबंधित शाळांचीही झडती घेतली. मात्र, तपासादरम्यान कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही. धमकीचा ई-मेल कोणी पाठवला, याचा शोध आता पोलीस घेत आहेत.

दरम्यान, या ई-मेलमध्ये खलिस्तान आणि काही संघटनांचा उल्लेख असल्याचे सांगितले जात आहे. १९८४ मधील ऑपरेशन ब्लू स्टारचा बदला घेण्यासाठी हल्ले करण्याचा दावा संदेश पाठवणाऱ्याने केल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, या दाव्यांची अधिकृत पुष्टी होणे बाकी असून, धमकीमागील सत्यता तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.


हेही वाचा
सर्व पहा