पणजी: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन मंगळवार, २७ ऑक्टोबर रोजी गोवा भेटीवर येत असून, त्या दिवशी आयोजित भाजप राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत मगोप-भाजप युतीशी निगडीत मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. पक्षाचे राष्ट्रीय संयुक्त संघटन सरचिटणीस शिव प्रकाश आणि गोवा प्रभारी डॉ. भारती पवार यांनी गुरुवारी गोवा भेटीदरम्यान मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांच्याशी सविस्तर चर्चा केली. या बैठकीला उपाध्यक्ष दत्ता खोलकर, सरचिटणीस सिद्धार्थ कुंकळयेकर आणि सर्वानंद भगत यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
महाराष्ट्रावादी गोमंतक पक्षाने शिरोडा आणि फोंडा या मतदारसंघांबाबत धरलेल्या आग्रहाच्या पार्श्वभूमीवर रविवारी होणारी भाजप राज्य कार्यकारिणीची बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. या बैठकीत युतीच्या समीकरणांसोबतच आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाची रणनीती आणि संघटन बळकटीकरणावर सखोल मंथन होणार आहे. ज्या मतदारसंघांमध्ये भाजपचे आमदार नाहीत, तेथे नेत्यांवर विशेष जबाबदाऱ्या सोपवल्या जाणार आहेत. या बैठकीत महत्त्वपूर्ण राजकीय ठराव मंजूर केले जातील आणि नितीन नबीन कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतील, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी दिली.
दरम्यान, मगोपचे ज्येष्ठ नेते सुदिन ढवळीकर यांनी फोंडा मतदारसंघावर केलेल्या दाव्याबाबत विचारले असता, दामू नाईक यांनी थेट भाष्य करण्याचे टाळत 'नो कॉमेंट्स' असे उत्तर दिले. राजकारणात प्राप्त परिस्थितीनुसार आणि योग्य वेळी निर्णय घेतले जातात, असे सांगत ढवळीकर यांनी या गोष्टीची नोंद घ्यावी, असे ते म्हणाले. दुसरीकडे, निवडणुका जसजशा जवळ येत आहेत, तसतसे पक्षात बैठकांचे सत्र वाढणार असल्याचे सांगून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आगामी काळात निवडणुकीच्या पूर्वतयारीला अधिक वेग दिला जाईल असे स्पष्ट केले.


