पणजी: देशातील दुसऱ्या हरितक्रांतीला चालना देण्यासाठी संशोधक, शास्त्रज्ञ आणि उद्योग क्षेत्रातील धोरणात्मक युती महत्त्वाची आहे. नवीन क्रांतीमध्ये जमिनीचे आरोग्य सुधारणे, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे आणि शाश्वत आर्थिक संधी निर्माण करणे यांवर भर दिला पाहिजे, असे मत गोवा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीच्या अध्यक्षा प्रतिमा धोंड यांनी व्यक्त केले. कृषी महाविद्यालय आणि आशियाई पीजीपीआर संस्थेतर्फे आयोजित परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी एम एस रेड्डी, डॉ. एन बी प्रकाश, सुरेश कुंकळळेकर व अन्य अधिकारी उपस्थित होते.
धोंड यांनी सांगितले की, पहिल्या हरितक्रांतीने अन्न सुरक्षा मजबूत करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. आता दुसऱ्या हरित क्रांतीमध्ये शाश्वततेवर अधिक भर दिला पाहिजे. हवामान बदल, जमिनीचा ऱ्हास, वाढता आयात खर्च आणि सुरक्षित अन्न प्रणालीची मागणी यांमुळे कृषी क्षेत्रातील आव्हाने वाढत आहेत. अशा वेळी पारंपरिक पद्धतींमध्ये बदल करणे गरजेचे आहे. या क्षेत्रातील वैज्ञानिक शोध हे व्यावसायिकदृष्ट्या फायदेशीर, परवडणारे आणि सहज उपलब्ध असणारे असले पाहिजेत. तरच त्याचा सकारात्मक परिणाम होईल.
त्या म्हणाल्या, गोवा राज्य जागतिक स्तरावर आंतरराष्ट्रीय पर्यटन आणि समृद्ध सांस्कृतिक वारशासाठी प्रसिद्ध आहे. असे असले तरी, येथील कृषी क्षेत्रातही विपुलता आहे. आपण सर्वांनी कृषी क्षेत्राला अधिक आकर्षक आणि फायदेशीर करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. यासाठी या क्षेत्रात आधुनिकता आणली पाहिजे. असे झाले तर तरुण पिढी शेतीपासून दूर जाणार नाही. चेंबरतर्फे या क्षेत्राच्या विकासासाठी विविध प्रयत्न केले जात आहेत. तांत्रिक प्रगती व स्थानिक सहकार्यातून गोव्याला नाविन्यपूर्ण उद्योजकतेचे एक साधन म्हणून स्थापन करण्याचे आमचे ध्येय आहे.
जैविक कृषी इनपुट्स, सेंद्रिय कंपोस्टिंग, अॅग्री-टेक, अन्न प्रक्रिया आणि कृषी-पर्यटन या क्षेत्रांत आधुनिक उद्योग उभारण्यासाठी गोवा एक आदर्श केंद्र बनू शकते, असा विश्वास धोंड यांनी व्यक्त केला.


