पणजी: येणाऱ्या काळात कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात 'एआय' क्षेत्रात रोजगाराच्या व विकासाच्या अनेक संधी उपलब्ध होणार असून गोव्यातील युवकांनी या सुवर्णसंधीचा पुरेपूर फायदा घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले आहे. राज्यातील शाळा आणि महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांसाठी आयटी आणि शिक्षण खात्याच्या संयुक्त विद्यमाने एआय शिक्षण देणाऱ्या विशेष कार्यशाळा आयोजित करण्याचा सरकारचा विचार असून यासाठी एआय लॅब सुरू केल्या जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.
गुरुवारी आयोजित गोव्यातील पहिल्या एआय परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते. या प्रसंगी राज्याचे आयटी मंत्री रोहन खंवटे, आमदार चंद्रकांत शेट्ये, आमदार प्रेमेंद्र शेट, आयटी संचालक कबीर शिरगावकर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. या परिषदेत बोलताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील सर्व राज्यांना एआय क्षेत्रात प्रगती करण्याचे आणि राज्यस्तरीय एआय धोरण तयार करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत गोवा राज्याने 'एआय धोरण २०२६' जाहीर करून या क्षेत्रात देशात आघाडी घेतली आहे.
शाळा आणि महाविद्यालयांमधील सध्याच्या पायाभूत सुविधांचा वापर करून प्रत्येक तालुका स्तरावर एआय शिक्षणाचा उपक्रम सुरू करण्याची योजना आहे. याशिवाय कौशल्य विकास आणि क्षमता वाढीसाठी सरकार युवकांना सातत्याने पाठबळ देत आहे. याच उपक्रमाचा भाग म्हणून बीआयटीएस (बिट्स) पिलानी आणि गोव्याच्या आयटी खात्यादरम्यान महत्त्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आला असून, याचा थेट फायदा राज्यातील विद्यार्थ्यांना होणार आहे.
कार्यक्रमात माहिती तंत्रज्ञान मंत्री रोहन खंवटे यांनी सांगितले की, गोव्यातील तरुणांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि आयटी क्षेत्राला गती देण्यासाठी हे एआय धोरण अत्यंत महत्त्वपूर्ण ठरत आहे. देशातील अत्यंत मोजक्या राज्यांनी असे प्रगत धोरण लागू केले असून त्यात गोव्याचा समावेश होणे ही अभिमानास्पद बाब आहे. याशिवाय पर्वरी येथे सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर अत्याधुनिक टेक पार्क उभारण्याचा सरकारचा विचार असून, यामुळे राज्यात मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील..


