गोमेकॉ रुग्णालयातील उंदरांवर नियंत्रण ठेवा!

काही महिन्यांपूर्वी गोवा वैद्यकीय महाविद्यालयात (गोमेकॉ) उपचार घेत असलेल्या एका रुग्णाचा पाय उंदराने कुरतडला होता. या प्रकरणाची मानव अधिकार आयोगाने गंभीर दखल घेतली आहे. आयोगाने गोमेकॉ प्रशासनाला उंदरांवर नियंत्रण ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.


2 hours ago
गोमेकॉ रुग्णालयातील उंदरांवर नियंत्रण ठेवा!

गोवन वार्ता प्रतिनिधी
पणजी
काही महिन्यांपूर्वी गोवा वैद्यकीय महाविद्यालयात (गोमेकॉ) उपचार घेत असलेल्या एका रुग्णाचा पाय उंदराने कुरतडला होता. या प्रकरणाची मानव अधिकार आयोगाने गंभीर दखल घेतली आहे. आयोगाने गोमेकॉ प्रशासनाला उंदरांवर नियंत्रण ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. याशिवाय या परिसरात स्वच्छता ठेवणे, कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावणे, अतिरिक्त पेस्ट कंट्रोल करणे, उंदराच्या जाण्याच्या वाटा बंद करणे अशा विविध शिफारसी केल्या आहेत. याबाबत गोमेकॉ प्रशासनाने केलेल्या कारवाईचा अहवाल २२ डिसेंबर २०२६ पूर्वी देण्याचे निर्देश आयोगाने दिले आहेत.
याबाबत युवराज मांद्रेकर यांनी मानवाधिकार आयोगाकडे तक्रार केली होती. यामध्ये २९ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजता वॉर्ड क्र. ३ मध्ये झोपलेल्या एका रुग्णाला उंदराने चावल्याने गंभीर रक्तस्राव झाल्याचे म्हटले होते. आयोगाने याप्रकरणी गोमेकॉ प्रशासन आणि आरोग्य सचिवांना नोटीस बजावली होती. सुनावणी दरम्यान गोमेकॉ प्रशासनाने या घटनेनंतर येथील उंदरांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेल्या विविध उपाय योजनांची माहिती दिली. यामध्ये वॉर्डच्या खिडक्यांना अॅक्रेलिक शीट बसवणे, दररोज स्वच्छता करणे यांचा समावेश आहे. यावेळी पणजी महानगरपालिका सकाळी एकदाच कचरा गोळा करत असल्याचे सांगण्यात आले.
आयोगाने गोमेकॉ प्रशासनाला रुग्णालयात सुरक्षित वातावरण राखण्यात अपयश आल्याचे म्हटले आहे. त्यामुळे मानव अधिकारांचे उल्लंघन होत आहे, असे निरीक्षण आयोगाने नोंदवले. अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी आयोगाने प्रशासन आणि राज्य सरकारला विविध निर्देश दिले आहेत. आयोगाने वॉर्डांमधील उंदरांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रात्रीच्या वेळी अतिरिक्त उपाययोजना करणे, सर्व वॉर्डांमधील उंदरांच्या येण्या-जाण्याच्या जागा सील करणे, वॉर्डची नियमित स्वच्छता करणे, या कामाची अधिकाऱ्यांद्वारे पाहणी करणे, कचऱ्याचे योग्य वर्गीकरण करणे, याबाबत रुग्णांमध्ये जागृती करणे, याचे कोकणी व मराठी, हिंदी इंग्रजी भाषेत फलक लावणे असे उपाय सांगितले आहेत.
कचऱ्याची दिवसातून दोन वेळा उचल करा
मानवाधिकार आयोगाने गोमेकॉ रुग्णालय प्रशासनाला वाया गेलेले अन्न टाकण्यासाठी मोठ्या आकाराचे कचऱ्याचे डबे वापरण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच पणजी महानगरपालिकेला येथील कचऱ्याची दिवसातून किमान दोन वेळा उचल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

हेही वाचा
सर्व पहा