शेळी-लोलये येथे खून; संतप्त जमाव रस्त्यावर

लोलये-शेळी येथील चिकन विक्री सेंटरवर बुधवारी सायंकाळी तेथे काम करणाऱ्या संजय नाईक (३७) याचा लोखंडी सळीने डोक्यात प्रहार करून खून करण्यात आला. माहिती मिळाल्यानंतर संतप्त जमावाने संशयिताच्या घराला वेढा दिला. संशयिताला ताब्यात देण्याची मागणी केली. मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात होता.


21st October, 11:55 pm
शेळी-लोलये येथे खून; संतप्त जमाव रस्त्यावर

संशयित एडवर्डच्या घरासमोर जमलेला जमाव आणि पोलीस. (अशोक देसाई)

गोवन वार्ता  प्रतिनिधी

काणकोण

लोलये-शेळी येथील चिकन विक्री सेंटरवर बुधवारी सायंकाळी तेथे काम करणाऱ्या संजय नाईक (३७) याचा लोखंडी सळीने डोक्यात प्रहार करून खून करण्यात आला. माहिती मिळाल्यानंतर संतप्त जमावाने संशयिताच्या घराला वेढा दिला. संशयिताला ताब्यात देण्याची मागणी केली. मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात होता.      

चिकन सेंटरच्या शेजारीच संशयित एडवर्ड मोंतेरोचे घर आहे. संजय नाईक आणि एडवर्ड यांच्यात वारंवार भांडणे होत. बुधवारी दोघांमध्ये बाचाबाची झाली. रागाच्या भरात एडवर्डने संजय नाईकच्या डोक्यात लोखंडाची सळीचा जोरदार प्रहार केला.  संजय जागीच गतप्राण झाला. खूनानंतर एडवर्ड घरातच लपून बसला. ही बातमी पसरताच सुमारे ३०० ग्रामस्थांनी एडवर्डच्या घराला घेराव घातला.

चिकन सेंटरचे मालक शेखर नाईक यांनी सांगितले की, एडवर्ड वरचेवर संजयला मारहाण करण्यासाठी येत होता. याची तक्रार पोलिसांत दिली होती. इतकेच नव्हे तर पोलिसांना सीसीटीव्ही फुटेजही दिले होते. त्यामध्ये एडवर्ड शस्त्रे घेऊन अंगावर धावून येत होता, हे दिसत होते. मात्र पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष केले. हे प्रकरण उपजिल्हाधिकारी पाहतील, असे सांगून पोलीस वेळ मारून नेत होते.


संतप्त जमावाने एडवर्डच्या घराला घेराव घातला. त्यांनी एडवर्डच्या घराची आणि वाहनाची तोडफोड केली. एडवर्डला अटक केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला आहे. पोलीस अधीक्षक अक्षत आयुुष, मामलेदार रोहन पायस, उपअधीक्षक, चार निरीक्षक घटनास्थळी दाखल झाले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी कुंकळ्ळी, केपे येथून अधिक कुमक मागवली. सुमारे सहा तासांनंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन मडगाव येथील रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.

परिस्थितीवर नियंत्रणासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात

खून केल्यानंतर संशयित एडवर्ड घरात लपून बसला होता. स्थानिकांनी एडवर्डच्या घराशेजारी गर्दी केली होती. एडवर्डला ताब्यात देण्याची मागणी स्थानिक करत होते. जमावाकडून संताप व्यक्त होत असल्याने काणकोण पोलिसांनी केपे, कुंकळ्ळी येथूनही पोलिसांची कुमक मागवली. पोलीस अधिकारी जमावाची समजूत काढण्याचा प्रयत्न करत होते. रात्री उशिरापर्यंत जमाव एडवर्डच्या घरासमोरच होता. पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेतलेले नव्हते.

हेही वाचा
सर्व पहा