फोंडा : कासावली-मोले येथे गोवा सरकारच्या कर्मचारी भरती आयोगातर्फे पाठविलेली दि. १७ ऑक्टोबर रोजीच्या परीक्षेची पत्रे पोस्टमनने दि. १९ रोजी देण्यात आल्याने ३ युवकांना परीक्षेला मुकावे लागले. कर्मचारी भरती आयोगाने दि २८ सप्टेंबर रोजी पाठवलेली पत्रे कुळे पोस्ट कार्यालयात दि. ५ ऑक्टोबर रोजी पोहचली होती. पण पोस्टमनच्या निष्काळजीपणामुळे ३ युवकांना परीक्षेपासून वंचित राहावे लागले आहे. या संबंधी युवकांच्या पालकांनी बुधवारी पोस्टमन विरोधात कुळे पोस्ट मास्तरकडे तक्रार दाखल केली आहे.
कासावली येथील ३ युवकांना दि. १९ ऑक्टोबर रोजी एलडीसी पदासाठी परीक्षा असल्याची पत्रे मिळाली. पण परीक्षा दि. १७ रोजी दुपारी २.३० ते ४ वाजेपर्यंत असल्याचे वाचल्यावर युवकांना संताप आला. कारण पोस्टमनने पत्रे उशिरा दिल्याने युवकांना परीक्षेपासून वंचित राहावे लागले. युवकांना मिळालेल्या पत्रांवर कुळे येथील पोस्ट कार्यालयात दि. ५ ऑक्टोबर रोजी मिळाल्याचा स्टॅम्प दिसून येत आहे. त्याशिवाय एका पालकाने दि. १३ ऑक्टोबर रोजी पोस्टमनकडे पत्राबद्दल चौकशी केली होती. सदर पोस्टमन कार्यालयात भेटत नसल्याच्याही तक्रारी वाढल्या आहेत. त्यामुळे पोस्ट मास्तरने पोस्टमनवर कारवाई कारण्याची मागणी पालक तसेच स्थानिक लोक करत आहेत.
शिल्पा गावडे या महिलेने सांगितले की, आपल्या मुलाने सरकारी नोकरीसाठी अर्ज केला होता. पण परीक्षेसाठी पाठवलेले पत्र उशिरा मिळाल्याने मुलाला परीक्षा देणे शक्य झाले नाही. पोस्टमनमुळे मुलाला परीक्षा चुकली असून पोस्टमनवर कारवाई करण्याची गरज आहे.
सरकारने गांभीर्याने दखल घ्यावी!
अर्जुन गावकार या पालकाने दिलेल्या माहितीनुसार, पोस्टमनने दि. १९ रोजी पत्र घरी आणून दिले होते. पण परीक्षेची तारीख दि. १७ रोजी असल्याने मुलाची परीक्षा चुकली. पोस्टमनच्या निष्काळजीपणामुळे गावातील ३ युवकांना परीक्षेला मुकावे लागले आहे. निष्काळजीपणा केलेल्या पोस्टमनविरोधात पोस्ट मास्तरकडे तक्रार देण्यात आली आहे. सरकारने यासंबंधी गांभीर्याने लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचे ते म्हणाले.


