पेडणे :हरमल येथील हरमल पंचक्रोशी हायर सेकेंडरी शाळेत लहान वही आणल्याच्या क्षुल्लक कारणावरून एका शिक्षिकेने चौदा वर्षीय विद्यार्थ्याला वर्गात थोबाडीत मारल्याची घटना घडली. या मारहाणीत विद्यार्थ्याला दुखापत झाल्यानंतर पालकाने ही बाब शाळेच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर मांडली. ग्रुपवर शिक्षकांच्या वर्तणुकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याचा राग मनात धरून, संबंधित पालकाला जाब विचारण्याच्या बहाण्याने शाळेत बोलावून घेण्यात आले.
तक्रारदार महिला शाळेत पोहोचल्यानंतर शिक्षकांनी संगनमत करून त्यांना शाळेच्या कंट्रोल रूममध्ये दोन्ही बाजूंनी कुलूप लावून डांबून ठेवले. त्यानंतर त्यांना धक्काबुक्की करत शिवीगाळ करण्यात आली. या प्रकारानंतर पीडित पालकाने मांद्रे पोलीस ठाण्यात जाऊन सविस्तर तक्रार नोंदवली.
या तक्रारीच्या आधारे मांद्रे पोलिसांनी पूजा भानकर, प्रसाद शेटगावकर, माधवी कुंभार, सोनाली सुबाजी, अंकिता आणि साहिल या सहा शिक्षकांविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम ११५(२), १२७(२), १३१, ३५२, ३(५) आणि गोवा बाल अधिनियम २००३ च्या कलम ८ अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक गिरेन्द्र जनार्दन नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.


