कमी वेळेत जास्त पैशांच्या हव्यासापोटी इंजिनिअर बनला ड्रग्ज पेडलर

हणजूण पोलिसांनी केलेल्या चौकशीत संशयित अभिषेक हा ऑटोमेशन इंजिनिअर असून कमी वेळात जास्त पैसे मिळवण्याच्या मोहातून तो ड्रग्ज तस्करीकडे वळल्याचे समोर आले होते.


3 hours ago
कमी वेळेत जास्त पैशांच्या हव्यासापोटी इंजिनिअर बनला ड्रग्ज पेडलर

म्हापसा : पुणे येथे ऑटोमेशन इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतलेल्या ठाणे-मुंबई येथील एका युवकाने कमी काळात जास्त पैसे मिळवण्याच्या मोहातून ड्रग्ज तस्करीचा मार्ग पत्करला. हणजूण पोलिसांनी त्याला पकडल्यानंतर हा प्रकार समोर आला. दरम्यान, या प्रकरणातील ड्रग्ज पुरवठादाराला मुंबईतून अटक करण्यात आली आहे.

मुनांगवाडा-आसगाव येथील ९.७० लाखांच्या ९७ एलएसडी पेपर ड्रग्जप्रकरणी हणजूण पोलिसांनी अमली पदार्थांचा पुरवठादार हसन इमाम शेख (५०, रा. मुंबई) याला अटक केली. या प्रकरणी पोलिसांनी अभिषेक जयप्रकाश सिंग (३५, रा. ठाणे-मुंबई) या ऑटोमेशन अभियंत्याला यापूर्वी अटक केली होती. दि. १६ ऑक्टोबर रोजी हणजूण पोलिसांनी विश्वसनीय माहितीच्या आधारे मुनांगवाडा-आसगाव येथील फुटबॉल मैदानाजवळ छापा टाकला होता. या कारवाईत पोलिसांनी ९७ एलएसडी पेपर ब्लॉट हा ड्रग्ज जप्त केला होता. या ड्रग्जची किंमत ९ लाख ७० हजार रुपये आहे. संशयित अभिषेक सिंग याला ड्रग्ज प्रतिबंधक कायदा कलम २२ (क) अंतर्गत गुन्हा नोंदवून अटक केली होती. पोलीस चौकशीत संशयित अभिषेक हा ऑटोमेशन इंजिनिअर असून त्याने हे शिक्षण पुणे येथे पूर्ण केले आहे. परंतु कमी वेळात जास्त पैसे मिळवण्याच्या मोहातून तो ड्रग्ज तस्करीकडे वळल्याचे समोर आले होते.

पोलीस निरीक्षक कृष्णा सिनारी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अमीर तरल, नितेश शिंगाडी, कॉन्स्टेबल शानू राऊत, प्रकाश पोळेकर, अभिषेक कासार, विजय नाईक, राजेश गोकर्णकर, विनोद केरकर, प्रशांत परब, सदाशिव नाईक आणि आदित्य बागली या पथकाने ही कामगिरी केली. पुढील तपास पोलीस अधीक्षक राहुल गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

चौकशीत उघड झाले मुंबई कनेक्शन

पोलिसांनी या ड्रग्ज तस्करांचे धागेदोरे शोधून काढण्यासाठी सखोल तपास सुरू केला. संशयिताने हा ड्रग्ज मुंबईतून गोव्यात आणल्याचे उघड होताच त्याची पोलिसांनी कसून चौकशी केली. तेव्हा संशयिताला हा ड्रग्ज मुंबईतील हसन इमाम शेख याने दिल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार हणजूण पोलीस पथकाने मुंबईमध्ये स्थानिक पोलिसांच्या मदतीने संशयिताला अटक केली. संशयित हसन शेख हा सराईत ड्रग्ज तस्कर असून त्याच्याविरुद्ध यापूर्वी दिल्ली आणि मुंबई पोलिसांत गुन्हे नोंद आहेत. 

हेही वाचा
सर्व पहा