गोवन वार्ता प्रतिनिधी
पणजी
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि मगो दरम्यान युतीची चर्चा सुरू आहे. पहिली बैठक दोन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांच्या शासकीय बंगल्यावर पार पडली. या बैठकीत मगोने फोंडा आणि शिरोडा मतदारसंघ सोडा, अशी अपेक्षा व्यक्त केली. मात्र भाजप नेत्यांनी दोन्ही मतदारसंघ देण्यास नकार दिला. त्यामुळे मगो नेत्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार असल्याचे स्पष्ट केले. युतीच्या वाटाघाटीसाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह भाजपचे प्रमुख नेते आणि मगोचे अध्यक्ष दीपक ढवळीकर, मंत्री सुदिन ढवळीकर यांच्या उपस्थितीत पहिली बैठक सोमवारी झाली. बैठकीत विद्यमान घडामोडींचा आढावा घेण्यात आला. मडकई व मांद्रे मतदारसंघात मगोचे आमदार असल्यामुळे ते मगोकडे राहतील, असे मगो नेत्यांनी गृहित धरले आहे. याशिवाय फोंडा व शिरोडा मतदारसंघांत पक्षाची ताकद असल्यामुळे ते मगोला मिळावेत, अशी अपेक्षा ढवळीकर यांनी व्यक्त केली. मात्र गेल्या निवडणुकीत या जागा भाजपने जिंकल्यामुळे त्या मगोला देणे शक्य नसल्याचे भाजपने स्पष्ट केले. त्यामुळे मगो नेत्यांनी दिल्लीत जाऊन अमित शहा यांना मध्यस्थीसाठी साकडे घालण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, निवडणुकीच्या दीड महिना आधी युती जाहीर करणार असल्याचे दीपक ढवळीकर यांनी सांगितले. पक्षाचे काम सर्व मतदारसंघांत सुरू असून मी कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे ते योग्य वेळ आल्यावर कळेल. अध्यक्ष या नात्याने सर्व मतदारसंघात मी भेटी देत असतो, असेही दीपक ढवळीकर म्हणाले.
युती, जागा वाटपाबाबत चर्चा नाही
भाजपबरोबर युती वा जागा वाटपासंबंधी अद्याप चर्चा झालेली नाही. भाजपबरोबर युती होईल. मी काही कामानिमित्त मुख्यमंत्र्यांना भेटण्यास आलो होतो. जीत आरोलकर हे मगोचे आमदार आहेत, ते मगो पक्षातच राहतील, असे दीपक ढवळीकर यांनी स्पष्ट केले.
युती तुटण्याची शक्यता
मगोने फोंडा, मडकई, शिरोडाचा हट्ट धरला आहे. भाजपने मडकई वगळता फोंडा तालुक्यातील कुठलाही मतदारसंघ देणार नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे महिन्याभरात युती तुटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


