पेडणे
पावसाळ्याचे दिवस संपत आले असतानाच पेडणे तालुक्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाने जोर धरल्याने जनजीवन विस्कळीत झाले. नवरात्रोत्सवाच्या नवमीच्या दिवशी तालुक्याच्या विविध भागांत पावसाने जोरदार हजेरी लावली. अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी तुंबल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला, तर दुसरीकडे शेतांमध्ये पाणी साचल्यामुळे कापणीच्या टप्प्यावर आलेली भातशेती धोक्यात आली आहे.
तालुक्यातील अनेक भागांत भातपिके कापणीसाठी पूर्णपणे तयार झाली होती. शेतकऱ्यांनी कापणी आणि मळणीची पूर्वतयारी सुरू केली असतानाच अचानक आलेल्या या पावसाने त्यांच्या मेहनतीवर पाणी फिरण्याची भीती निर्माण झाली आहे. शेतात साचलेल्या पाण्यामुळे भाताचे पीक कुजण्याची शक्यता असून, पाऊस असाच सुरू राहिल्यास कापणीची कामे खोळंबणार असल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे.
कासारवर्णे परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी वाहून आल्याने संपूर्ण रस्त्यावर पाण्याचा वेढा पडला होता. विमानतळाच्या बाजूने मोठ्या प्रमाणात पाणी वाहून आल्यामुळे रस्त्यावर पाण्याचा साठा निर्माण झाला. यामुळे वाहनचालकांसह स्थानिक पादचाऱ्यांना ये-जा करताना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागला.
शेतकऱ्यांसमोर दुहेरी संकट
यंदाच्या हंगामात भातशेती उत्तम बहरली होती आणि कापणीच्या अंतिम टप्प्यावर पोहोचली असताना अवकाळीसारख्या कोसळणाऱ्या या पावसाने शेतकऱ्यांसमोर नवे संकट उभे केले आहे. भात कापणीसाठी कोरड्या हवामानाची गरज असते, मात्र सततच्या पावसामुळे कापणी पुढे ढकलावी लागणार आहे. पावसाळा संपण्याच्या मार्गावर असताना अचानक उद्भवलेल्या या परिस्थितीमुळे तालुक्यातील रस्त्यांवरील तसेच शेतातील पाण्याचा त्वरित निचरा करण्यासाठी प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून व शेतकऱ्यांकडून केली जात आहे.


