पणजी : मांडवी नदीतील सर्व २२ ठिकाणच्या पाण्याच्या नमुन्यांमध्ये ‘फिकल कोलिफॉर्म’ जिवाणूंचे प्रमाण निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक आढळले आहे. या संदर्भात गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने (जीएसपीसीबी) गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयात सादर केलेल्या अंतरिम अहवालातून हे स्पष्ट झाले आहे. मात्र, मांडवी नदीत उभ्या असलेल्या कॅसिनोंकडून सांडपाणी सोडले जात नसल्याचे अहवालात नमूद करून त्यांना दिलासा दिला आहे.
मळा तलावात मोठ्या प्रमाणात मासळी मृतावस्थेत आढळल्यानंतर उच्च न्यायालयाने या घटनेची स्वेच्छा दखल घेतली होती. या प्रकरणात न्यायालयाला मदत करण्यासाठी अॅड. नाईजल फर्नांडिस यांची अॅमिकस क्युरी म्हणून नियुक्ती करण्यात आली. सुनावणीदरम्यान न्यायालयाने जीएसपीसीबीला मांडवी नदीपात्रातील कॅसिनो आणि पूल परिसरातील पाण्याच्या गुणवत्तेची तपासणी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते.
न्यायालयाच्या निर्देशानुसार, जीएसपीसीबीने २४ ऑगस्ट रोजी मांडवी पुलापासून इफ्फी जेटीपर्यंतच्या भागात २२ ठिकाणी भरती आणि ओहोटीच्या वेळी पाण्याचे एकूण ४४ नमुने गोळा केले. मंडळाच्या निकषांनुसार, प्रति १०० मिली पाण्यात फिकल कोलिफॉर्मचे प्रमाण कमाल १०० एमपीएन असणे आवश्यक आहे. मात्र, तपासणीत भरतीच्या वेळी हे प्रमाण १३० ते ५४० एमपीएन, तर ओहोटीच्या वेळी १३० ते ९४० एमपीएनपर्यंत नोंदवण्यात आले. त्यामुळे सर्व २२ ठिकाणचे नमुने निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक प्रदूषित असल्याचे अंतरिम अहवालात नमूद करण्यात आले आहे.
कॅसिनोंमधील सांडपाणी बार्जद्वारे पाटो येथील मलनिस्सारण प्रकल्पात नेले जात असल्याने त्यांच्याकडून थेट सांडपाणी सोडले जात नसल्याचे अहवालात नमूद आहे. दुसरीकडे, सांतिनेझ खाडीतून दर मिनिटाला १० हजार ते १५ हजार लिटर प्रक्रिया न केलेले सांडपाणी मांडवीत मिसळत असल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे. रुआ द ओरेम खाडी आणि पेन्हा द फ्रान्स परिसरातील नाल्यांचाही नदीतील जिवाणूंचे प्रमाण वाढण्यास हातभार लागत असल्याचे अहवालात म्हटले आहे. जीएसपीसीबी ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात परतीच्या पावसाळ्यानंतरचे नमुने गोळा करणार आहे. त्यानंतर मांडवीतील अंतिम सविस्तर अहवाल डिसेंबरमध्ये न्यायालयासमोर सादर करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
रासायनिक निकष समाधानकारक
फिकल कोलिफॉर्मचे प्रमाण अधिक असले, तरी पाण्याचे अन्य रासायनिक निकष समाधानकारक असल्याचे अहवालात म्हटले आहे. पाण्याचा पीएच ६.७७ ते ७.७८, तर विरघळलेल्या ऑक्सिजनचे प्रमाण ५.८० ते ८.५० मि.ग्रॅ. प्रतिलिटर आढळले. हे प्रमाण जलचरांसाठी योग्य असल्याचे नमूद करण्यात आले आहे. जैविक ऑक्सिजनची गरज (बीओडी), नायट्रेट आणि नायट्राइट यांचे प्रमाणही सुरक्षित मर्यादेत असल्याचे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.


