काणकोणमध्ये ६५ जणांनी मांडल्या समस्या

‘सरकार तुमच्या दारी’ उपक्रमात विविध मागण्यांवर चर्चा

Story: गोवन वार्ता। प्रतिनिधी |
17th October, 11:44 pm
काणकोणमध्ये ६५ जणांनी मांडल्या समस्या


‘सरकार तुमच्या दारी’ कार्यक्रमात मंत्री दिगंबर कामत यांच्याकडे आपली समस्या मांडताना किशोर शेट. सोबत निखील देसाई, गुरुदास देसाई.

काणकोण : नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्यासाठी आयोजित ‘सरकार तुमच्या दारी’ कार्यक्रमाला शनिवारी काणकोण येथील रवींद्र भवनात प्रतिसाद मिळाला. यावेळी एकूण ६५ जणांनी विविध समस्या मांडल्या. सार्वजनिक बांधकाममंत्री दिगंबर कामत यांनी संबंधित खात्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना समस्या सोडवण्याचे निर्देश दिले.
फ्लॅटच्या मालकी हक्कापासून गृहआधार, दयानंद सामाजिक सुरक्षा योजना, घरे नियमित करणे, शेतकऱ्यांचे अनुदान, आरोग्य केंद्रातील सुविधा, शॅक्स व्यवसाय आणि मतदान केंद्रापर्यंत रस्ता नसल्याच्या समस्या नागरिकांनी मांडल्या. ऑर्किड पॉलीहाऊसचे बांधकाम न करता कंत्राटदार निघून गेल्याची तक्रारही करण्यात आली. गृहआधार, ‘माझे घर’ आणि दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेतील अडचणी सोडवण्यासाठी लवकरच विशेष शिबिरे घेण्यात येतील, असे मंत्री दिगंबर कामत यांनी सांगितले. मडगावच्या दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात डिसेंबरपर्यंत सर्व सुविधा मोफत उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाला शेतकी सचिव निखील देसाई, कुशावती जिल्ह्याचे जिल्हाधिकारी गुरुदास तुबकी देसाई, काणकोणचे उपजिल्हाधिकारी भगवंत करमली आणि मामलेदार रोहन पायस उपस्थित होते. यावेळी विठ्ठल पागी, दिनेश देसाई, सोनू वेळीप आणि सुमती रायकर या चौघांना जमिनीच्या सनदा देण्यात आल्या.
काँग्रेस कार्यकर्त्यांची निदर्शने
काँग्रेस कार्यकर्त्यांनी जनार्दन भंडारी यांच्या नेतृत्वाखाली रवींद्र भवनाबाहेर विविध समस्यांचे फलक घेऊन निदर्शने केली. कार्यकर्ते कार्यक्रमस्थळी जाण्याचा प्रयत्न करत असल्याने पोलिसांनी त्यांना रोखले. कार्यक्रम संपल्यानंतर मंत्री कामत यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना भेटून त्यांचे म्हणणे ऐकून घेतले.            

हेही वाचा
सर्व पहा