पणजी : इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) २०२७ मधील २० व्या हंगामासाठी सर्व १० फ्रँचायझींनी आतापासूनच जोरदार तयारी सुरू केली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) खेळाडूंच्या लिलावासाठी गोव्याची निवड केल्यानंतर आता संभाव्य तारीखही समोर आली आहे. यंदाचा मिनी लिलाव येत्या १६ डिसेंबर रोजी गोव्यात पार पडण्याची शक्यता आहे.
मागील काही लिलावांचे आयोजन परदेशात करण्यात आले होते. मात्र, यंदा बीसीसीआयने हा लिलाव भारतातच आयोजित करण्याचा निर्णय घेतला असून, त्यासाठी गोव्याची निवड करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आयपीएल २०२७ चा मिनी लिलाव १६ डिसेंबर रोजी गोव्यातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये आयोजित करण्याचे नियोजन आहे. १७ ऑक्टोबर रोजी बीसीसीआयच्या लॉजिस्टिक्स टीमने फ्रँचायझींना पाठवलेल्या संदेशातून ही माहिती समोर आली आहे.
लिलावाची तारीख आणि ठिकाणाबाबत फ्रँचायझी मालकांना किंवा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना अद्याप अधिकृत ई-मेल पाठवण्यात आलेला नाही. मात्र, बीसीसीआयच्या मॅसेजमध्ये आयपीएल २०२७ चा खेळाडू लिलाव १६ डिसेंबर रोजी दक्षिण गोव्यातील ‘आयटीसी ग्रँड गोवा’ येथे होईल, असे नमूद करण्यात आले आहे. तसेच, लिलावापूर्वीची औपचारिक बैठक १५ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.
बीसीसीआयच्या लॉजिस्टिक्स टीमने हा मेसेज प्रामुख्याने गोव्यातील प्रवास, राहण्याची सोय आणि इतर व्यवस्थांचे नियोजन करण्यासाठी पाठवला आहे. त्यामुळे लवकरच आयपीएल फ्रँचायझींच्या मालकांना आणि सीएंओना याबाबत अधिकृत ई-मेलद्वारे माहिती पाठवली जाण्याची शक्यता आहे.
लिलावाच्या काळातच श्रीलंकेसोबत सामना
लिलावाच्या काळातच भारतीय संघ मायदेशात श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळत असणार आहे. या मालिकेतील दुसरा एकदिवसीय सामना १६ डिसेंबर रोजी बंगळुरू येथील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.


