चक दे इंडिया! भारतीय महिलांनी पटकावले ४४ वर्षांनी सुवर्णपदक

आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६: एकाच दिवशी १० पदकांची कमाई

Story: गोवन वार्ता । न्यूज डेस्क |
just now
चक दे इंडिया! भारतीय महिलांनी पटकावले ४४ वर्षांनी सुवर्णपदक

नागोया : आशियाई क्रीडा स्पर्धेच्या तेराव्या दिवशी भारताच्या सुवर्णपदक विजेत्या खेळाडूंनी आणि संघाने इतिहास रचला आहे. भारतासाठी शुक्रवारचा दिवस अत्यंत ऐतिहासिक आणि सुवर्णयशाचा ठरला असून, भारतीय संघाने शुक्रवारी एकाच दिवसात तब्बल १० पदकांची लयलूट केली आहे. यामध्ये ६ सुवर्ण, ३ रौप्य आणि १ कांस्य पदकाचा समावेश आहे. या नेत्रदीपक कामगिरीमुळे आशियाई क्रीडा स्पर्धेतील भारताचे एकूण पदक ७६ वर पोहोचले असून, क्रीडा जगतात भारताचा डंक्का वाजत आहे.
विशेषतः, भारताच्या महिला हॉकी संघाने तब्बल ४४ वर्षांनंतर सुवर्णपदक जिंकत इतिहास रचला आहे, तर दुसरीकडे तिरंदाजी आणि बॉक्सिंगमध्येही भारतीय खेळाडूंनी सुवर्णपदके जिंकून देशाची मान अभिमानाने उंचावली आहे.
या सुवर्णमयी दिवसातील सर्वात मोठी आणि ऐतिहासिक कामगिरी भारतीय महिला हॉकी संघाने केली. फायनलच्या अटीतटीच्या सामन्यात भारताने चीनचा १-० असा पराभव करत तब्बल ४४ वर्षांनंतर आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदकास गवसणी घातली. यापूर्वी भारताने १९८२ मध्ये महिला हॉकीत सुवर्णपदक जिंकले होते. त्यानंतर आता २०२६ मध्ये पुन्हा एकदा सुवर्णपदकावर आपले नाव कोरले आहे.
सामन्याच्या सुरुवातीलाच भारताची आघाडीची खेळाडू लालरेम्सियामी हिचा आंतरराष्ट्रीय सामन्यांचा द्विशतक (२००० वा सामना) गाठल्याबद्दल सत्कार करण्यात आला. लालरेम्सियामीने या विशेष प्रसंगाला आणखी संस्मरणीय बनवत १० व्या मिनिटाला एक अप्रतिम गोल केला. साक्षीच्या पासवर तिने हवेतून घेतलेला चेंडू थेट चिनी गोलरक्षकाला हुलकावणी देत जाळ्यात जाऊन आदळला.
या ऐतिहासिक सामन्यात भारताची बचाव फळी अत्यंत मजबूत राहिली. दुसऱ्या क्वार्टरमध्ये चीनने गोल करण्याची संधी साधली होती, मात्र भारताची अनुभवी गोलरक्षक सविता पुनिया हिने जिगरबाज डाईव्ह मारत चीनची खेळाडू झांग यिंग हिचा गोल रोखला आणि भारताची आघाडी कायम राखली. संपूर्ण सामन्यात चीनने कडवी टक्कर दिली, परंतु भारतीय महिलांनी अत्यंत संयमी आणि आक्रमक खेळ करत सामना १-० ने जिंकला आणि ४४ वर्षांची प्रतीक्षा संपवून सुवर्णपदक जिंकले.
बॉक्सिंगच्या रिंगणात भारतीय खेळाडूंनी आज तिहेरी सुवर्णपदकांची कमाई करत जोरदार यश मिळविले. भारताची स्टार बॉक्सर लव्हिना बोरगोहाईन हिने महिलांच्या ७५ किलो वजनी गटात चीनच्या झियी बाओ हिचा ५-० अशा दणदणीत फरकाने पराभव करत सुवर्णपदक जिंकले. लव्हिनाने वाढदिवसाच्या दिवशीच हा सुवर्णविजय मिळवत देशवासीयांना मोठी भेट दिली आहे. या सुवर्णपदकासह दिग्गज मेरी कोम नंतर आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी लव्हिना ही केवळ दुसरी भारतीय महिला बॉक्सर ठरली आहे. परवीनने उत्कृष्ट मुष्टियुद्धाचे प्रदर्शन करत चायनीज ताईपेच्या निएन-चिन चेन हिचा २-० ने पराभव करून भारताला दुसरे सुवर्णपदक मिळवून दिले. पुरुषांच्या ८० किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत अंकुश पांघलने दक्षिण कोरियाच्या किम मिन्सोय याचा पराभव करत तिसरे सुवर्णपदक भारताच्या झोक्यात टाकले.
तिरंदाजीमध्ये भारताने पराक्रमाची नवी शिखरे सर केली आहेत. महिलांच्या रिकर्ब संघाने अंतिम फेरीत बलाढ्य दक्षिण कोरियाचा रोमांचक सामन्यात पराभव करत ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकले. १७ वर्षांच्या युवा तिरंदाज कुमकुम मोहोड हिने अंतिम फेरीत अत्यंत दबावाखाली अचूक '१०' च्या लक्षवेधी नोंदी करत विजयात मोलाची भूमिका बजावली. तिला अनुभवी अंकिता भगत आणि कीर्ती यांची उत्तम साथ लाभली. तसेच, संमिश्र रिकर्ब संघात कुमकुम मोहोड आणि धिरज बोम्मदेवरा यांनी भारताला रौप्य पदक मिळवून दिले. तर पुरुषांच्या रिकर्ब संघानेही अंतिम फेरीत पोहोचत रौप्य पदकाची कमाई केली.
कुस्तीत सुजित कलकलची सुवर्णझेप
कुस्तीच्या आखाड्यात भारतासाठी सुजित कलकल याने शानदार कामगिरी केली. पुरुषांच्या ६५ किलो फ्रीस्टाइल कुस्तीच्या अंतिम फेरीत सुजितने ताजिकिस्तानच्या अब्दुलमाहझिद कुदिएव्ह याचा अटीतटीच्या लढतीत पराभव केला आणि भारतासाठी कुस्तीतील पहिले सुवर्णपदक जिंकले. त्याच्या या विजयामुळे भारताच्या सुवर्णपदकांची संख्या १५ वर पोहोचली.
दिवसाभरातील इतर महत्त्वाचे क्रीडा निकाल
सेलिंग (नौकानयन): नेत्र कुमानन हिने महिलांच्या डिंग्गी प्रकारात कांस्य पदक पटकावले.
व्हॉलीबॉल व रग्बी: पुरुषांच्या व्हॉलीबॉल संघाने दक्षिण कोरियाचा ३-१ असा पराभव केला, तर महिलांच्या रग्बी सेव्हन्समध्ये भारताने मलेशियाचा २६-५ असा दणदणीत पराभव केला.
आजच्या १० पदकांच्या विक्रमी कमाईनंतर, आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताची एकूण पदकसंख्या ७६ वर पोहोचली आहे. यामध्ये १६ सुवर्ण, २५ रौप्य आणि ३५ कांस्य पदकांचा समावेश असून, भारतीय खेळाडूंच्या या कामगिरीमुळे देशामध्ये आनंदाचे आणि अभिमानाचे वातावरण पसरले आहे.