नागोया : आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या खेळाडूंनी धमाकेदार कामगिरी करत देशाची मान अभिमानाने उंचावली आहे. भारतीय महिला हॉकी संघाने यजमान जपानचा ३-१ असा पराभव करत थेट उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. या विजयासह भारताने पूल ‘ब’ मध्ये सलग चौथा विजय मिळवत १२ गुणांसह अव्वल दोन संघांमध्ये आपले स्थान पक्के केले आहे. दुसरीकडे, क्रीडा स्पर्धेच्या सहाव्या दिवशी भारताने नेमबाजीत सुवर्ण आणि रौप्य पदकाची कमाई केली, तर टेबल टेनिस, ॲथलेटिक्स आणि नेमबाजीत उत्कृष्ट कामगिरी करत भारताच्या पदकांची संख्या २३ वर पोहोचवली आहे.
गिफू प्रेफेक्चरल ग्रीन स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या पूल ‘ब’च्या अतिशय चुरशीच्या सामन्यात भारतीय महिला हॉकी संघाने यजमान जपानचा ३-१ असा पराभव केला. सामन्याच्या सुरुवातीपासूनच भारतीय खेळाडूंनी आक्रमक पवित्रा घेतला होता.
पहिल्या क्वार्टरमध्ये जपानच्या गोलरक्षक यू कुडो हिने नवनीत कौरचा गोल करण्याचा प्रयत्न निकामी केला; परंतु रिबाऊंडवर आलेल्या चेंडूवर लालरेम्सियामी ह्मार्झोटे हिने अत्यंत चपळाई दाखवत अचूक गोल केला आणि भारताला १-० अशी आघाडी मिळवून दिली.
जपानने पहिल्या क्वार्टरमध्येच पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. त्यांना पेनल्टी कॉर्नरही मिळाला होता; परंतु भारतीय संघाची कर्णधार आणि अनुभवी गोलरक्षक सविता पुनियाने माहो उएनोचा गोल करण्याचा प्रयत्न निष्फळ ठरवत भारताची आघाडी कायम राखली.
दुसऱ्या क्वार्टरच्या उत्तरार्धात भारताला पेनल्टी कॉर्नर मिळाला. नवनीतचा प्रयत्न रोखल्यानंतर इशिका चौधरीने रिबाऊंडवर गोल करत भारताची आघाडी २-० अशी वाढवली. त्यानंतर तिसऱ्या क्वार्टरमध्ये नवनीत कौर हिने जपानच्या बचावात्मक फळीला चकवा देत एक सुरेख मैदानी गोल केला आणि भारताची पकड ३-० अशी मजबूत केली.
चौथ्या व अंतिम क्वार्टरच्या सुरुवातीला जपानने आक्रमक पवित्रा घेत शिहो कोबायाकावा हिच्या टोमाहॉक शॉटच्या साहाय्याने १ गोल परतवला. यानंतर जपानने भारतावर सतत हल्ले चढवले, मात्र सविता पुनियाच्या नेतृत्वाखाली भारतीय बचावफेळीने हा दबाव यशस्वीपणे परतवून लावला.
भारताने ४ सामन्यांतून १२ गुणांसह पूल ‘ब’मध्ये आपले स्थान बळकट केले आहे. आता भारताचा अंतिम पूल सामना रविवारी सिंगापूरविरुद्ध होणार आहे. गत आशियाई क्रीडा स्पर्धेत (हांगझोऊ) भारताने कांस्य पदक जिंकले होते, यंदा सुवर्ण पदकावर भारताचे लक्ष लागले आहे.
टेबल टेनिसच्या मिश्र दुहेरी प्रकारात मानुष शहा आणि दिया चितले यांनी उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली. चीनच्या वांग चुकिन आणि सन यिंग्शा या तगड्या जोडीविरुद्ध झालेल्या अटीतटीच्या सामन्यात पराभव पत्करावा लागला असला, तरी त्यांनी भारतासाठी कांस्य पदक निश्चित केले.
महिलांच्या गोळाफेक (शॉट पुट) अंतिम फेरीत मप्रणित कौरने १७.१७ मीटर लांब गोळाफेक करत देशासाठी कांस्य पदक जिंकले. भारताने सांघिक खेळांमध्येही आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. भारताचे पुरुष आणि महिला दोन्ही कबड्डी संघ सुवर्ण पदकाच्या अंतिम फेरीत पोहोचले आहेत. तसेच स्क्वॅश प्रकारात जोशना चिनप्पा, वेलवन सेंथिलकुमार आणि अनाहत सिंग यांनी भारतासाठी पदके निश्चित केली आहेत.
पदकतालिकेत भारताची घोडदौड
सहाव्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताच्या खात्यात आणखी ६ नवीन पदके जमा झाली. त्यामुळे भारताची एकूण पदकसंख्या २३ वर पोहोचली असून भारत पदक तालिकेत १२ व्या स्थानावर मजबूत स्थितीत आहे. यापूर्वी महिला क्रिकेट संघाने स्पर्धेतील भारताचे पहिले सुवर्ण पदक जिंकले होते. आतापर्यंत भारताने २ सुवर्ण, ८ रौप्य आणि १३ कांस्य पदकांची कमाई केली आहे.
आजच्या दिवसाचे सामने
कबड्डी : पुरुष आणि महिला दोन्ही कबड्डी संघांचे सुवर्ण पदकासाठी इराणविरुद्ध सामने रंगणार आहेत.
तिरंदाजी : भारताच्या तिरंदाजी मोहिमेची सुरुवात होणार असून, यामध्ये रिकर्व्ह आणि कंपाउंड प्रकारातील पुरुष व महिलांचे वैयक्तिक व सांघिक सामने खेळवले जातील.
हॉकी : भारतीय पुरुष हॉकी संघ पूल ‘ए’ मधील सामन्यात जपानविरुद्ध मैदानात उतरणार आहे.
बॅडमिंटन: पुरुष एकेरीच्या सामन्यात भारताचा स्टार खेळाडू लक्ष्य सेन सिंगापूरच्या यू केन लोह याच्याशी मुकाबला करेल.
बॉक्स
नेमबाजीत सुवर्ण
भारताच्या कमलजीत आणि सुरुची इंदर सिंग या जोडीने १० मीटर एअर पिस्तूल मिश्र-संघ अंतिम फेरीत आशियाई विक्रम प्रस्थापित करत सुवर्ण पदकाला गवसणी घातली. या भारतीय जोडीने ४८४.६ गुण मिळवले. त्यांनी दक्षिण कोरियाच्या संघाला तब्बल ६.६ गुणांनी मागे टाकले. दक्षिण कोरियाला ४७८.० गुणांसह रौप्य पदकावर समाधान मानवावे लागले, तर इराणने ४१५.८ गुणांसह कांस्य पदक जिंकले. ५० मीटर रायफल ३ पोझिशन्सच्या पुरुषांच्या सांघिक प्रकारात ऐश्वर्य प्रताप सिंग तोमर, रुद्रनक्ष पाटील आणि नीरज कुमार यांच्या भारतीय त्रिकूटाने १७६२ गुण मिळवत दुसरे स्थान पटकावले आणि रौप्य पदक आपल्या नावावर केले. या प्रकारात चीनने १७६६ गुणांसह सुवर्ण, तर दक्षिण कोरियाने १७५१ गुणांसह कांस्य पदक जिंकले.


