काँग्रेसकडून एसआयआरबाबत चुकीचा नॅरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न : दामू नाईक

गोवा भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी मतदार यादीतील नावे वगळण्याबाबत स्पष्टीकरण देत निवडणूक आयोगाची प्रक्रिया पारदर्शक असल्याचे सांगितले आणि काँग्रेसच्या 'गोवा राखण यात्रे'वर कडाडून टीका केली.

Story: गोवन वार्ता | प्रतिनिधी |
just now
काँग्रेसकडून एसआयआरबाबत चुकीचा नॅरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न :  दामू नाईक

पणजी : गोव्यातील मतदार याद्यांमधून नावे वगळण्यावरून आणि विशेष संक्षिप्त पुनरीक्षण प्रक्रियेवरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाचे गोवा प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी पत्रकारांशी विरोधकांच्या आरोपांचा जोरदार समाचार घेतला. निवडणूक आयोग स्वतंत्रपणे काम करत असून मतदार यादी सुधारणा प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. दुहेरी नोंदणी व बोगस मतदानाला आळा घालण्यासाठीच ही कायदेशीर कारवाई होत असल्याचे त्यांनी सांगितले. संगणकीय त्रुटी किंवा गोव्यातून स्थलांतरित झालेल्या मतदारांची नावे प्रक्रियेनुसार हटवली गेली असावीत, असेही त्यांनी नमूद केले.

 शहरांमध्ये भाड्याच्या घरांत राहणारे नागरिक मूळ ठिकाणी गेल्यानंतर नियमानुसार त्यांची नावे जुन्या ठिकाणच्या मतदार यादीतून हटवली जातात. दुहेरी नोंदणी किंवा इतर राज्यांमधून येणाऱ्या मतदारांचे बेकायदेशीर मतदान रोखणे ही लोकशाहीची गरज आहे. ही प्रक्रिया नोंदणी अधिकारी, बीएलओ आणि राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत पार पडते. त्यामुळे राजकीय हेतूने नावे वगळल्याचा आरोप बिनबुडाचा असल्याचे नाईक म्हणाले.

काँग्रेसच्या 'गोवा राखण यात्रे'वर टीका करताना दामू नाईक म्हणाले की, ही यात्रा गोव्याच्या रक्षणासाठी नसून स्वतःचे राजकीय अस्तित्व वाचवण्यासाठी धडपडणाऱ्या काँग्रेस पक्षाची 'काँग्रेस राखण यात्रा' आहे. जनता सातत्याने नाकारत असल्यामुळे पक्ष वाचवण्यासाठी ही धडपड सुरू आहे. भाजप सरकारवर होणाऱ्या भ्रष्टाचाराच्या आरोपांचा समाचार घेत त्यांनी काँग्रेसच्या काळातील घोटाळ्यांची आठवण करून दिली. काँग्रेस पक्षाकडे कोणताही ठोस मुद्दा उरला नसल्याने ते जनतेमध्ये भ्रम पसरवण्याचा प्रयत्न करत असून, निवडणुकीतील संभाव्य अपयशाचे खापर आधीच निवडणूक यंत्रणेवर फोडत असल्याचा टोला त्यांनी लगावला.

दरम्यान, आपल्या दिल्ली दौऱ्याबाबत बोलताना दामू नाईक यांनी सांगितले की, हा दौरा नियमित स्वरूपाचा होता. या दौऱ्यादरम्यान आगामी विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात भाजपचे राष्ट्रीय संघटनमंत्री बी. एल. संतोष यांच्याशी सविस्तर चर्चा झाली. आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांचा दिल्ली दौरा पूर्णपणे स्वतंत्र होता आणि त्याचा आपल्या दौऱ्याशी कोणताही संबंध नव्हता, असेही नाईक यांनी स्पष्ट केले.


हेही वाचा
सर्व पहा