गोव्यातील कॅसिनोत ५ लाख जिंकल्याची कुणकुण मित्रांना लागताच तरुणाचे अपहरण करून विवस्त्र मारहाण, ९० हजार उकळले

गोव्यातील कॅसिनोत ५ लाख रुपये जिंकलेल्या कोल्हापुरातील एका तरुणाचे पैशांच्या वाट्यासाठी मित्रांनीच अपहरण करून, त्याला विवस्त्र मारहाण करत ९० हजार रुपये उकळले आणि त्याचा व्हिडिओ व्हायरल केला.

Story: गोवन वार्ता | प्रतिनिधी |
just now
गोव्यातील कॅसिनोत ५ लाख जिंकल्याची कुणकुण मित्रांना लागताच तरुणाचे अपहरण करून विवस्त्र मारहाण, ९० हजार उकळले

कोल्हापूर : गोव्यातील झगमगत्या कॅसिनोत नशीब आजमावत जुगाराच्या डावात तब्बल ५ लाख रुपयांची मोठी रक्कम जिंकल्याचा आनंद एका कोल्हापुरच्या तरुणासाठी भयानक स्वप्न ठरला आहे. पंचगंगा नदीपात्रात मासेमारी करून उदरनिर्वाह करणाऱ्या जुना बुधवार पेठ येथील आकाश चंद्रकांत मुळे याला जुगाराचा नाद होता. तो नेहमी गोव्यातील कॅसिनोत येऊन पैसे खर्च करायचा. ऑगस्ट महिन्यात खेळलेल्या एका डावात आकाशच्या हाती ५ लाख रुपयांचे जॅकपॉट लागले. जिंकलेली ही रक्कम घेऊन आकाश आनंदात कोल्हापुरात परतला. मात्र, हीच जिंकलेली रक्कम त्याच्यासाठी जीवघेणी ठरेल, याची कल्पना त्याने स्वप्नातही केली नव्हती.

कोल्हापुरात आल्यानंतर आकाशने गोव्यातील कॅसिनोत ५ लाख रुपये जिंकल्याची माहिती आपल्या परिचित वर्तुळात आणि मित्रांना दिली. ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. त्याचा मित्र फारुख खान याच्या कानावरही ही बातमी पडली. पैशांचा हा मोठा आकडा ऐकताच फारुखच्या मनात हाव निर्माण झाली. त्याने आकाशकडे या जिंकलेल्या रकमेतील ५ लाख रुपयांच्या हिशाची मागणी व्हॉट्सॲपवरून करण्यास सुरुवात केली. आकाशने पैसे देण्यास नकार देताच, त्याला सातत्याने फोनवरून धमक्या दिल्या जाऊ लागल्या.

एक सप्टेंबरच्या रात्री साडेआठच्या सुमारास आकाश हा बिनखांबी गणेश मंदिर परिसरातून जात असताना फारुख खान, देवेंद्र सूर्यवंशी आणि विक्रम पाटील यांनी त्याला अचानक गाठले. काही समजण्याच्या आतच त्याला कानाखाली मारून जबरदस्तीने जवळच्या करवीर लॉजमधील एका खोलीत डांबण्यात आले. तिथे खोलीत बंद करून त्याला बेदम मारहाण करण्यात आली आणि त्याच्या खिशातील ६० हजार रुपये हिसकावून घेतले. त्यांच्या भीतीने आकाश सांगलीला नातलगांकडे निघून गेला.

मात्र, हा थरार तिथेच थांबला नाही. १० सप्टेंबरच्या रात्री कराडला जाण्यासाठी आकाश कोल्हापुरातील मध्यवर्ती बसस्थानकाजवळील परीख पुलावरून जात असताना एका पांढऱ्या रंगाच्या चारचाकी वाहनाने त्याला पुन्हा अडवले. कारमधून उतरलेल्या फारुख खान, विक्रम पाटील, देव्या सूर्यवंशी आणि त्यांच्या एका अनोळखी साथीदाराने आकाशचे अपहरण केले. त्याला वाहनात डांबून महामार्गालगतच्या गोकुळ शिरगाव परिसरातील एका निर्जन माळरानावर नेण्यात आले.

त्या अंधाऱ्या आणि निर्जन माळरानावर चौघांनी आकाशला अत्यंत निर्दयीपणे मारहाण केली. त्याचे अंगावरील कपडे काढून त्याला पूर्णपणे विवस्त्र करण्यात आले आणि त्याच्या खिशातील आणखी ३० हजार रुपये हिसकावून घेतले. एवढ्यावरच न थांबता, संशयित देवेंद्र सूर्यवंशी याने आकाशचा विवस्त्र अवस्थेतील व्हिडिओ स्वतःच्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला. अजून १० हजार रुपये न दिल्यास हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत त्याला केवळ अंडरपँटवर त्या निर्जन ठिकाणी सोडून संशयित पसार झाले.

अत्यंत घाबरलेल्या आकाशने कसतरी गोकुळ शिरगाव गाठून एका अनोळखी व्यक्तीच्या मोबाईलवरून मित्राला फोन केला आणि कपडे मागवून लॉजमध्ये आश्रय घेतला. बदनामीच्या भीतीने त्याने सुरुवातीला पोलिसांत जाणे टाळले. मात्र, १९ सप्टेंबर रोजी आरोपींनी हा व्हिडिओ 'शिवाजी पेठ' या व्हॉट्सॲप ग्रुपवर पाठवून व्हायरल केला. स्वतःचा व्हिडिओ ग्रुपवर पाहून खचलेल्या आकाशने अखेर जुना राजवाडा पोलिस ठाणे गाठून फिर्याद दिली. या घटनेवरून पोलिसांनी फारुख खान, विक्रम पाटील, देव्या सूर्यवंशी आणि एका अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला असून, पोलिस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत.

हेही वाचा
सर्व पहा