हळदोणा सार्वजनिक गणेशोत्सवात सिद्धिविनायकाच्या पूजेच्या नारळाला विक्रमी ७ लाख रुपयांची बोली

हळदोणा सार्वजनिक गणेशोत्सवात सिद्धिविनायकाच्या पूजेच्या नारळाची ७ लाख रुपयांना विक्रमी पावणी झाली असून, या निधीचा उपयोग मंदिराचा जीर्णोद्धार आणि सामाजिक कार्यासाठी केला जाणार आहे.

Story: गोवन वार्ता | प्रतिनिधी |
11 mins ago
हळदोणा सार्वजनिक गणेशोत्सवात सिद्धिविनायकाच्या पूजेच्या नारळाला विक्रमी ७ लाख रुपयांची बोली

पणजी : बार्देश तालुक्यातील हळदोणा येथील प्रसिद्ध सार्वजनिक गणेशोत्सव २०२६ च्या सांगता सोहळ्यात सिद्धिविनायकाच्या पूजेच्या नारळाची म्हणजेच गणपतीचा पायकडल्या नारळाची जाहीर पावणी आयोजित करण्यात आली होती. या लिलावात हळदोणा गावचे रहिवासी श्री. महेंद्र गरड यांनी तब्बल ७ लाख रुपयांची विक्रमी बोली लावून हा नारळ प्राप्त केला आहे. मंडळाच्या वतीने आणि उपस्थितांकडून धार्मिक व सामाजिक कार्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल महेंद्र गरड यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले असून, महागणपतीची कृपादृष्टी त्यांच्या परिवारावर राहो अशी प्रार्थनाही करण्यात आली.



देवाच्या पूजेच्या नारळाच्या पावणीची परंपरा आणि भाविकांची दृढ श्रद्धा

सामान्यांसाठी एका नारळाची बाजारातील किंमत अवघी ३० ते ४० रुपये असली, तरी धार्मिक उत्सवांमध्ये भाविकांच्या दृष्टीने या नारळाचे मूल्य आतील खोबऱ्यावरून ठरत नसते. महिनाभर किंवा उत्सव कालावधीत केलेली भक्तिभावाने पूजा, नवस आणि देवाचा मिळणारा थेट आशीर्वाद यामुळे भाविक या जाहीर लिलावात श्रद्धेने लाखांची बोली लावतात. जत्रोत्सव, शिगमोत्सव किंवा गणेशोत्सवा दरम्यान देवाच्या चरणांवर किंवा मुख्य कलशावर ठेवलेल्या नारळात विशेष आशीर्वाद आणि सकारात्मक ऊर्जा वास करते, अशी भाविकांची ठाम धारणा आहे. हा नारळ घरात आणल्याने सुख, शांती आणि समृद्धी लाभते व घरातील संकटे दूर होतात, या विश्वासापोटी ही बोली लावली जाते.

कोकण असो किंवा गोवा, कोणत्याही उत्सवाच्या सांगतेवेळी किंवा जत्रेच्या रात्री देवाच्या वस्तूंची जाहीर लिलाव पुकारण्याची प्रथा अत्यंत जुनी आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे. कोकणी आणि गोमंतकीय परंपरेत या लिलावाला 'पावणी' असे म्हटले जाते. या लिलावात देवस्थानचे महाजन, स्थानिक नागरिक आणि भाविक अत्यंत उत्साहाने सहभाग घेतात. अलीकडच्या काळात गोव्यातील विविध मंदिरांमध्ये अशा पूजेच्या नारळांची पावणी लाखोंच्या घरात पोहोचल्याचे दिसते. हळदोण्यातील ७ लाखांच्या या लिलावाव्यतिरिक्त, पेडणे तालुक्यातील कोरगाव येथील श्री देव रघुगोनशेट मंदिरात पूजेच्या नारळाची पावणी तब्बल १४ लाख रुपयांपर्यंत पोहोचल्याची नोंद आहे. काही ठिकाणी ही रक्कम अगदी २४ लाखांपर्यंत जाते. 

या लिलाव प्रक्रियेचा सर्वांत महत्त्वाचा आणि सामाजिक पैलू म्हणजे पावणीतून जमा होणारी सर्व रक्कम थेट देवस्थानच्या किंवा मंडळाच्या कोषागारात जमा केली जाते. या निधीचा उपयोग मंदिराचा जीर्णोद्धार, वार्षिक उत्सवांचे आयोजन आणि विविध सामाजिक व लोककल्याणकारी कार्यांसाठी केला जातो. नारळासोबतच देवाला अर्पण केलेली फळावळ, विडा, कापड आणि दागिन्यांचीही अनेक मंदिरांमध्ये रीतसर पावणी केली जाते. 

हेही वाचा
सर्व पहा