नवी दिल्ली : निवडणूक आयोगाच्या मतदार यादीच्या ‘स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन’वरून (एसआयआर) सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर ‘कॉकक्रोच जनता पार्टी’ने (सीजेपी) मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. कुमार यांनी ४८ तासांत राजीनामा न दिल्यास देशभर आंदोलन छेडण्याचा इशारा सीजेपीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी गुरुवारी दिला. या आंदोलनाची सांगता दिल्लीत ‘जंतरमंतर २.०’च्या माध्यमातून करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.नवी दिल्ली येथे पत्रकार परिषदेत दिपके यांनी ही घोषणा केली. सीजेपीने ‘इलेक्शन कमिशन ठीक करो’ या मोहिमेचीही घोषणा केली आहे. एसआयआर प्रक्रियेदरम्यान मतदारांची नावे वगळली जात असल्याचा आरोप करत, या प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. आगामी विधानसभा निवडणुका स्थगित कराव्यात आणि एसआयआर प्रक्रियेला स्थगिती देऊन मतदार यादी पूर्वस्थितीत आणावी, अशी मागणीही सीजेपीने केली आहे.
सीजेपीच्या प्रमुख मागण्या
१. ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा :
मुख्य निवडणूक आयुक्तांनी तातडीने राजीनामा द्यावा आणि त्यांच्याविरोधात कारवाई करावी, अशी मागणी सीजेपीने केली आहे.
२. एसआयआरला स्थगिती :
मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरावलोकनाची प्रक्रिया थांबवावी तसेच आगामी निवडणुका तूर्त स्थगित कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.
३. निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीच्या २०२३च्या कायद्यात बदल :
मुख्य निवडणूक आयुक्त आणि अन्य निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीशी संबंधित २०२३चा कायदा रद्द करण्याची मागणीही सीजेपीने केली आहे.
आयोगाकडून प्रक्रिया सर्वसंमतीने झाल्याचे स्पष्टीकरण
दरम्यान, निवडणूक आयोगातील दोन आयुक्तांनी विविध निर्णयांवर आक्षेप घेतल्याच्या वृत्तामुळेही वादाला तोंड फुटले आहे. ‘मिडिया’च्या वृत्तानुसार, निवडणूक आयुक्त सुखबीर सिंह संधू आणि विवेक जोशी यांनी मतदार नोंदणी, नावे वगळणे तसेच मतदार यादी व्यवस्थापनाशी संबंधित निर्णयांवर दहा महिन्यांत किमान १४ वेळा आक्षेप नोंदवले होते.
मात्र, निवडणूक आयोगाने लेखी निरीक्षणे, सूचना आणि मतभेद हे निर्णयप्रक्रियेतील सामान्य भाग असल्याचे स्पष्ट केले आहे. एसआयआरसह आयोगाने घेतलेले अंतिम निर्णय सर्वसंमतीने झाल्याचे आयोगाने म्हटले आहे.
सीजेपीने दिलेल्या ४८ तासांच्या मुदतीपैकी आता २४ तासांचा कालावधी शिल्लक असल्याने पुढील हालचालींकडे लक्ष लागले आहे. मागणी मान्य न झाल्यास देशभर आंदोलन सुरू करण्याचा इशारा सीजेपीने दिला आहे.


