महिलांना सर्वच बाबतीत संधी मिळावी : राष्ट्रपती

एकतानगर येथे ७२ वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. गोमंतकीय चित्रपटसृष्टीसाठी अभिमानास्पद कामगिरी करत ‘मोग आसू’ या कोकणी चित्रपटाने सर्वोत्कृष्ट कोकणी चित्रपटाचा पुरस्कार पटकावला.

Story: अजय लाड |
22nd September, 11:38 pm
महिलांना सर्वच बाबतीत संधी मिळावी : राष्ट्रपती

एकतानगर (गुजरात) : एका चित्रपटामागे अनेक व्यक्तींचा सहभाग असतो. पुरस्कारप्राप्त कलाकारांसह बॅक स्टेज कलाकारांचा हा गौरव आहे. पुरस्कार मिळालेल्या कलाकारात महिलांची संख्याही जास्त आहे. परीक्षकही महिला असाव्यात. सर्व बाबतीत महिलांना संधी मिळणे गरजेचे आहे. कलाकृती निर्माण कार्यासाठी कार्यरत सर्व कर्मचारी यांचा सन्मान होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केले.

एकतानगर येथील ७२ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वितरण सोहळ्यात त्या बोलत होत्या.

गोमंतकीय चित्रपटसृष्टीसाठी अभिमानास्पद कामगिरी करत ‘मोग आसू’ या कोकणी चित्रपटाने सर्वोत्कृष्ट कोकणी चित्रपटाचा पुरस्कार पटकावला. आग्नेलो ब्रागांझा आणि राधेश्याम पिपलवा यांनी या चित्रपटाचे सह-दिग्दर्शन केले आहे. गोव्याच्या पार्श्वभूमीवर साकारलेल्या या चित्रपटाची कथा फँटसी आणि भावनिक विषयाभोवती फिरते. या चित्रपटात एका विधुर पुरुषाची कथा मांडण्यात आली आहे. ख्रिसमसच्या काळात त्याला आपल्या दिवंगत पत्नीचा आत्मा भेटतो. त्यानंतर ती त्याला दुःखातून सावरण्यास आणि आयुष्यात नव्या प्रेमाचा स्वीकार करण्यास मदत करते. या अनोख्या कथानकामुळे चित्रपटाला वेगळे स्थान मिळाले आहे.

‘मोग आसू’मध्ये पूरब कोहली, अंजली पाटील यांच्यासह गोव्यातील प्रसिद्ध कलाकार प्रिन्स जेकब आणि जॉन डिसिल्व्हा यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. चित्रपटाला मायरॉन एस्तिबेरो यांनी संगीत दिले असून चित्रपटातील गाण्यांनाही रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. 

‘श्रीकांत’ या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपटाचा पुरस्कार पटकावला. चित्रपटासाठी भूषण कुमार यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्रदान करण्यात आला. उद्योगपती श्रीकांत बोला यांच्या प्रेरणादायी जीवनावर आधारित या चित्रपटाला कथा, कलाकारांचा अभिनय आणि सामाजिक संदेशासाठी विशेष दाद मिळाली.

कार्तिक आर्यन, ममूटी सर्वोत्कृष्ट अभिनेते

अभिनयाच्या क्षेत्रात कार्तिक आर्यन आणि ममूटी यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. ‘चंदू चॅम्पियन’मधील भूमिकेसाठी कार्तिक आर्यनचा गौरव करण्यात आला. तर मल्याळम चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते ममूटी यांनाही त्यांच्या अभिनयासाठी हा सन्मान मिळाला.

यामी गौतम सर्वोत्कृष्ट अभिनेत्री

दिग्दर्शक आदित्य सुहास जांभळे यांच्या ‘आर्टिकल ३७०’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट फीचर फिल्मचा पुरस्कार मिळाला. याच चित्रपटातील अभिनयासाठी यामी गौतम हिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्रदान करण्यात आला.

दाक्षिणात्य अभिनेता धनुष यालाही यंदाच्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये गौरवण्यात आले. ‘कॅप्टन मिलर’ या चित्रपटातील अभिनयासाठी त्याला विशेष उल्लेख श्रेणीतील राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्रदान करण्यात आला.

स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या भव्य परिसरात झालेल्या या सोहळ्यात भारतीय चित्रपटसृष्टीतील विविध क्षेत्रांतील प्रतिभावंतांचा राष्ट्रीय स्तरावर गौरव करण्यात आला. दिल्लीबाहेर प्रथमच आयोजित झालेल्या या सोहळ्यामुळे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या इतिहासात एक नवा अध्याय जोडला गेला.

अनंत नाग यांना दादासाहेब फाळके पुरस्कार

कन्नड चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते अनंत नाग यांना भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पाच दशकांहून अधिक काळाच्या कारकिर्दीत त्यांनी ३०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. कन्नड तसेच भारतीय चित्रपटसृष्टीतील त्यांच्या योगदानाची दखल घेत त्यांना हा सन्मान देण्यात आला. यापूर्वी मल्याळम चित्रपटसृष्टीतील अभिनेते मोहनलाल यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.

हेही वाचा
सर्व पहा