भाजपची दादागिरी लवकरच संपुष्टात येणार


just now
भाजपची दादागिरी लवकरच संपुष्टात येणार

‘गोवा रक्षण यात्रे’त सहभागी झालेले काँग्रेसच्या सहप्रभारी अंजली निंबाळकर, युरी आलेमाव, गिरीश चोडणकर, एल्टन डिकॉस्टा, नेते व कार्यकर्ते. (नारायण पिसुर्लेकर)
गोवन वार्ता प्रतिनिधी
पणजी
भाजपच्या राजवटीत भ्रष्टाचार आणि अत्याचारात वाढ होत असून, गोवा विकण्याचा प्रकार सुरू आहे. मात्र, भाजपची दादागिरी आता लवकरच संपुष्टात येणार आहे, असे प्रतिपादन काँग्रेसचे नेते तथा विरोधी पक्ष नेते युरी आलेमाव यांनी केले. मंगळवारी पणजीतून काँग्रेसच्या ‘गोवा रक्षण यात्रे’ला सुरुवात झाली.
सकाळी ‘काँग्रेस भवन’समोर तिरंगा फडकवण्याचा कार्यक्रम झाला. दुपारी पणजीतील आंबेडकर पार्क येथून यात्रेला सुरुवात करण्यात आली. यात्रेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, आमदार कार्लुस फेरेरा, आमदार एल्टन डिकॉस्टा, दक्षिण गोव्याचे खासदार विरियातो फर्नांडिस, पक्षाचे गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे, सहप्रभारी अंजली निंबाळकर, तसेच पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नगर नियोजन खात्यातील ‘कलम ३९ अ’ रद्द करून गोवा वाचवण्याची गरज आहे. ‘इनफ इज इनफ’ संघटनेने केलेल्या मागण्यांना काँग्रेसचा पाठिंबा आहे. गोवा वाचवण्यासाठी सर्वांना एकत्र आणण्याचा उद्देश या यात्रेमागे आहे, असे आलेमाव यांनी सांगितले. यात्रेच्या पहिल्याच दिवशी मोठा प्रतिसाद मिळाला असून दिवसेंदिवस हा प्रतिसाद वाढत जाईल, असा विश्वास काँग्रेस नेत्यांनी व्यक्त केला.
सर्व मतदारसंघांतून मार्गक्रमण करणार यात्रा
भाजप सरकारविरोधात सर्वांना एकत्र आणण्यासाठी ‘गोवा रक्षण यात्रे’चे आयोजन करण्यात आले आहे. ही यात्रा राज्यातील सर्व मतदारसंघांतून जाणार आहे. संबंधित मतदारसंघातील कार्यकर्ते आणि नागरिकही यात्रेत सहभागी होतील, असे गोवा काँग्रेसचे प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी सांगितले. अखिल भारतीय काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी बुधवारी प्रियोळ मतदारसंघातील यात्रेत सहभाग घेतला. यात्रेच्या समारोपाला लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी उपस्थित राहणार आहेत.

हेही वाचा
सर्व पहा