आगामी सरकार आमचेच असेल : विश्वजीत राणे

पक्षात राहून सत्ता मिळविण्यासाठी रक्ताचे थेंब आटवणार; नवरात्री व नवरात्रीनंतरही राज्यात बऱ्याच चांगल्या गोष्टी घडणार आहेत. २०२७च्या निवडणुकीनंतर आगामी सरकार आमचेच असेल. पक्षाला सत्तेत आणण्यासाठी मेहनत नव्हे तर रक्ताचा प्रत्येक थेंब मी आटवणार आहे, असे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी म्हटले आहे.

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
20 mins ago
आगामी सरकार आमचेच असेल : विश्वजीत राणे

पणजी : नवरात्री व नवरात्रीनंतरही राज्यात बऱ्याच चांगल्या गोष्टी घडणार आहेत. २०२७च्या निवडणुकीनंतर आगामी सरकार आमचेच असेल. पक्षाला सत्तेत आणण्यासाठी मेहनत नव्हे तर रक्ताचा प्रत्येक थेंब मी आटवणार आहे, असे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी म्हटले आहे.

नगरनियोजन मंडळाच्या बैठकीनंतर आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी अनेक विषयांवर भाष्य केले. पक्षात दिगंबर कामत, बाबूश मोन्सेरात व इतर अनेक नेते आहेत. या सर्वांच्या कामामुळे राज्यात पुन्हा भाजपचेच सरकार येणार आहे. आता नवरात्री आहे. नवरात्री पूर्वी आणि नवरात्रीनंतर महिला, तरूण या सर्वांसाठी अनेक चांगल्या गोष्टी घडणार आहेत, असे विश्वजीत राणे म्हणाले.

गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी हल्लीच वाळपई मतदारसंघाला भेट दिली होती. लोकशाहीत कोणताही नेता कोणत्याही मतदारसंघात जाऊ शकतो. उद्या मी सुद्धा फातोर्डा मतदारसंघात जाऊ शकतो. मात्र किती प्रतिसाद द्यायचा, हे जनताच ठरवत असते. मी मुख्यमंत्र्यांना माझ्या मतदारसंघात निमंत्रित केले आहे. सत्तरीत मी कोणत्या बिळातून कुठे जातो, याचा थांगपत्ता कोणालाच लागत नाही.

तरीही सत्तरीच्या जनतेसाठी आजपर्यंत मी कार्य केलेले आहे. यापुढेही करणार आहे. कोणीही यात्रा काढली अथवा समाज माध्यमावर काहीही पोस्ट केले तरी मला फरक पडत नाही. कोणाला यात्रा काढायची आहे, त्याना ती काढायला हरकत नाही, असे काँग्रेसच्या ‘गोंय राखोण यात्रे’बाबत ते म्हणाले. नगरनियोजन खात्यात अनेक गोष्टी होणार आहेत. योग्य वेळी योग्य प्रकारे त्याची माहिती दिली जाईल, असे ते म्हणाले. 

हेही वाचा
सर्व पहा