पणजी : वडिलांच्या बनावट जन्म प्रमाणपत्र प्रकरणात गुन्हा शाखेने कारवाई करत आसगाव येथील जमीन फसवणूक प्रकरणातील संशयित आरोपी तथा माजी नगरसेवक तारक आरोलकर याला अटक केली आहे. या प्रकरणाच्या तपासादरम्यान आरोलकर याची भूमिका समोर आल्यानंतर गुन्हा शाखेने त्याला ताब्यात घेत अटक केली.
जमीन फसवणूकप्रकरणी यापूर्वी त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवून त्याला अटक करण्यात आली होती. सध्या कोलवाळ कारागृहात न्यायालयीन कोठडीत होते. त्यानंतर ओबीसी दाखल्यासाठी वडिलांचा कथित बनावट जन्मदाखला सादर केल्याप्रकरणी आरोलकर याच्याविरुद्ध काल आणखी एक गुन्हा नोंदवण्यात आला होता. त्यानंतर याप्रकरणी आज आरोलकर याला अटक करण्यात आली. जमीन फसवणूप्रकरणी त्याच्याविरुद्ध अनेक गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.
आसगाव येथील सर्व्हे क्रमांक ३७/४ मधील जमिनीचा मालक व अधिकृत व्यक्ती असल्याचे भासवून आरोलकर याने फिर्यादीचा विश्वास संपादन केला. बनावट विक्रीकरार दाखवून जमीन खरेदीसाठी ४० लाख रुपये आगाऊ घेतले; मात्र पुढील विक्री व्यवहार पूर्ण केला नाही किंवा रक्कम परत केली नाही, असा आरोप आहे. संबंधित जमीन जोजफ उर्फ जुझे एम. डिसोझा यांच्या मालकीची असल्याचे समोर आल्यानंतर तक्रार दाखल करण्यात आली. तोरसे न् पेडणे येथील जमीन विकायची असल्याचे भासवून मुरगावातील महिलेकडून ४१.८५ लाख रुपये घेतल्याच्या आरोपावरून म्हापसा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. धारगळ येथील जमीन विक्रीच्या नावाखाली बंगळुरूतील रिअल इस्टेट कंपनीची ८ कोटी रुपयांची फसवणूक केल्याच्या आरोपावरून कर्नाटकातील सदाशिव पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
१९ ऑगस्टला करण्यात आली होती अटक
फिर्यादी पंकज बजाज (दिल्ली) याच्या तक्रारीवरून गुन्हा शाखेने १७ आॅगस्ट रोजी आरोलकर याच्याविरुद्ध भादंसंच्या कलम ४२०, ४०६, ४६७, ४६८ व ४७१ अंतर्गत गुन्हा नोंदविला होता. १९ ऑगस्ट रोजी त्याला अटक करण्यात आली होती.
दरम्यान, तारक आरोलकर याच्या छातीत दुखू लागल्याने काल त्याला म्हापसा येथील उत्तर गोवा जिल्हा इस्पितळात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.


