नवी दिल्ली : नित्य वापरातील साबण, शाम्पू, टूथपेस्ट यांसारखी सौंदर्यप्रसाधने आणि कॉस्मॅटिक्स उत्पादने शाकाहारी आहेत की मांसाहारी, याची स्पष्ट ओळख आता ग्राहकांना खरेदीच्या वेळीच होणार आहे. केंद्र सरकारने कॉस्मॅटिक्स आणि सौंदर्यप्रसाधनांच्या पॅकेजिंगसंदर्भात एक अत्यंत महत्त्वाचा आणि धोरणात्मक निर्णय घेतला आहे. नवीन नियमांनुसार, या सर्व उत्पादनांच्या पॅकेटवर ती शाकाहारी आहेत की मांसाहारी, हे दर्शवणारे विशिष्ट रंगीत चिन्ह छापणे उत्पादकांसाठी बंधनकारक करण्यात आले आहे.
केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार मंत्रालयाने ‘लीगल मेट्रोलॉजी (पॅकेज्ड कमोडिटीज) रूल्स, २०११’ मध्ये सुधारणा करून हे नवीन नियम अधिकृतपणे लागू केले आहेत. यासंदर्भातील शासकीय अधिसूचना जारी करण्यात आली असून, हे सुधारित नियम तातडीने प्रभावात आले. नव्या नियमांनुसार, ज्या उत्पादनांच्या निर्मितीत कोणत्याही प्राणिजन्य घटकांचा वापर केलेला नाही, अशा पूर्णपणे शाकाहारी उत्पादनांच्या पॅकेटवर 'हिरवा ठिपका' छापणे आवश्यक असेल. तर दुसरीकडे, ज्या उत्पादनांमध्ये प्राणिजन्य घटकांचा किंवा चरबीचा समावेश आहे, अशा मांसाहारी उत्पादनांच्या पॅकेटवर 'लाल किंवा तपकिरी ठिपका'दर्शवणे आता बंधनकारक करण्यात आले आहे.
हे विशिष्ट चिन्ह उत्पादनाच्या पॅकेजिंगवरील मुख्य भागात, म्हणजेच ग्राहकांच्या दृष्टीस सहज पडेल अशा दर्शनी बाजूला छापावे लागणार आहे. त्यामुळे दुकानात खरेदी करताना ग्राहकांना कोणत्याही अडचणीशिवाय एका नजरेत उत्पादनाचा प्रकार ओळखणे शक्य होणार आहे.
अनेकदा सौंदर्यप्रसाधने, टूथपेस्ट, क्रीम्स किंवा साबण तयार करताना प्राण्यांची चरबी किंवा इतर प्राणिजन्य घटकांचा वापर केला जातो. मात्र, पॅकेटवर त्याचा स्पष्ट आणि सहज समजेल असा उल्लेख नसल्याने सामान्य ग्राहकांना या घटकांची अचूक माहिती मिळत नव्हती. अनेक नागरिक आपल्या धार्मिक, सांस्कृतिक किंवा वैयक्तिक विचारसरणीनुसार पूर्णपणे शाकाहारी उत्पादनांचा वापर करणे पसंत करतात. सरकारच्या या निर्णयामुळे ग्राहकांचा माहिती मिळवण्याचा आणि योग्य निवडीचा हक्क अधिक बळकट झाला असून, पारदर्शकता वाढण्यास मदत होणार आहे.


