‘मोग आसूं’ला सर्वोत्कृष्ट कोकणी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार; गोमंतकीय चित्रपटसृष्टीचा गौरव

७२ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये ‘मोग आसूं’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट कोकणी चित्रपटाचा बहुमान मिळाला आहे. या यशामुळे गोमंतकीय चित्रपटसृष्टीचे नाव राष्ट्रीय स्तरावर उंचावले असून सर्वत्र कौतुक होत आहे.

Story: गोवन वार्ता | प्रतिनिधी |
2 hours ago
‘मोग आसूं’ला सर्वोत्कृष्ट कोकणी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार; गोमंतकीय चित्रपटसृष्टीचा गौरव

मडगाव: गोमंतकीय चित्रपटसृष्टीसाठी अभिमानास्पद कामगिरी करत ‘मोग आसूं’ या कोकणी चित्रपटाने ७२ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट कोकणी चित्रपटाचा (बेस्ट फीचर फिल्म इन कोकणी) पुरस्कार पटकावला आहे.या पुरस्कारामुळे कोकणी चित्रपटसृष्टीत आनंदाचे वातावरण असून गोमंतकीय कलाकार आणि चित्रपटकर्मींमधून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

आग्नेलो ब्रागांझा आणि राधेश्याम पिपलवा यांनी या चित्रपटाचे सह-दिग्दर्शन केले आहे.गोव्याच्या पार्श्वभूमीवर साकारलेल्या या चित्रपटाची संकल्पना फँटसी आणि मानवी भावनांवर आधारित आहे. एका विधुर पुरुषाच्या आयुष्याभोवती ही कथा फिरते, ज्याला ख्रिसमसच्या काळात आपल्या दिवंगत पत्नीचा आत्मा भेटतो. ती त्याला जुन्या दुःखातून बाहेर पडण्यास आणि आयुष्यात नव्या प्रेमाचा स्वीकार करण्यास मार्गदर्शन करते. या अनोख्या कथानकामुळे चित्रपटाला वेगळे स्थान मिळाले आहे.

‘मोग आसू’मध्ये चित्रपटात पूरब कोहली, अंजली पाटील यांच्यासह गोव्यातील प्रसिद्ध कलाकार प्रिन्स जेकब आणि जॉन डीसिल्व्हा यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. साकारल्या आहेत. या चित्रपटाला मायरॉन एस्तिबेरो यांनी संगीत दिले असून, चित्रपटातील गाण्यांनाही रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

७२ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये ‘मोग आसू’ला मिळालेला हा सन्मान कोकणी भाषेतील चित्रपटांच्या राष्ट्रीय स्तरावरील वाटचालीतील महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

हेही वाचा
सर्व पहा