मडगाव : दिव्यांग वृद्धाच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेत केअरटेकरने आपल्या दोन साथीदारांच्या मदतीने तब्बल ७३ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार नावेली येथे उघडकीस आला आहे. या प्रकरणी मडगाव पोलिसांनी केअरटेकरसह तिघांविरुद्ध फसवणूक आणि गुन्हेगारी कट रचल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
नावेली- फातोर्डा येथील रहिवासी मारिया इनेझ फर्नांडिस यांनी यासंदर्भात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २०२१ ते २०२६ या कालावधीत हा प्रकार घडला. तक्रारदार महिलेचे पती कायतानो फर्नांडिस हे शारीरिकदृष्ट्या अक्षम असून दृष्टिहीन आहेत. त्यांच्या देखभालीसाठी कुंकळ्ळी येथील सोहेल शेख याची केअरटेकर म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.
पोलिसांच्या माहितीनुसार, सोहेल शेख याने त्याचा भाऊ रियान शेख आणि पॉलिन्हो या अन्य साथीदाराच्या मदतीने कायतानो यांची फसवणूक करण्याचा कट रचला. आरोपींनी त्यांच्या दिव्यांगत्वाचा गैरफायदा घेत विविध बँकांच्या कोऱ्या धनादेशांवर स्वाक्षऱ्या करून घेतल्या. तसेच त्यांचे एटीएम कार्ड आणि गुप्त क्रमांक मिळवून बँक खात्यातून सुमारे ७० लाख रुपये काढल्याचा आरोप आहे.
याशिवाय संशयितांनी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या नावेली शाखेत नेऊन विविध कागदपत्रांवर कथितरीत्या खोट्या स्वाक्षऱ्या घेतल्या, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
अशा प्रकारे दांपत्याची एकूण ७३ लाख रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या तक्रारीच्या आधारे मडगाव पोलिसांनी गुन्हा नोंदवून भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८(४) आणि ६१(२)(अ) अंतर्गत कारवाई सुरू केली आहे. महिला पोलीस उपनिरीक्षक अनुष्का परब पुढील तपास करीत आहेत.
बनावट स्वाक्षऱ्यांच्या आधारे घेतले ३ लाखांचे कर्ज
संशयितांनी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या नावेली शाखेत नेऊन विविध कागदपत्रांवर त्यांच्या कथितरीत्या खोट्या स्वाक्षऱ्या घेतल्या. त्यानंतर कायतानो यांच्या पेन्शनच्या आधारे ३ लाख रुपयांचे कर्ज मंजूर करून घेतले आणि ही रक्कम स्वतःच्या वैयक्तिक वापरासाठी वळवल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.


