पणजी बसस्थानक परिसरात झालेली वाहतूक कोंडी. नारायण पिसुर्लेकर
गोवन वार्ता प्रतिनिधी
पणजी
पर्वरी उड्डाणपुलावरील पर्वरीकडील एन्ट्री (प्रवेश) आणि एक्झिट (निर्गमन) पॉइंट बंद असल्याने मेरशी जंक्शनवरील वाहतूक कोंडीचे प्रमाण वाढले आहे. पणजीसह मेरशी जंक्शन ते बांबोळीपर्यंत गर्दीच्या वेळेत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. उड्डाणपुलावरून येणारी सर्व वाहने मेरशी जंक्शनपासून वळत असल्याने कोंडी होत असल्याची माहिती वाहतूक पोलीस अधीक्षक प्रबोध शिरवईकर यांनी दिली.
मंगळवारी सायंकाळी बांबोळी येथील नेक्सा शोरूम ते मेरशी सर्कलपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. काँग्रेसच्या गोवा रक्षण यात्रेमुळेही पणजीत वाहतूक कोंडी झाली. पर्वरीकडील प्रवेश आणि निर्गमन मार्ग बंद असल्याने गिरी परिसरातून उड्डाणपुलावरून येणारी वाहने मेरशी जंक्शनकडे वळवावी लागत आहेत. त्यातच आता गणेशोत्सव संपल्याने पणजीकडे येणाऱ्या वाहनांची संख्या वाढली आहे. मेरशी जंक्शनवरील सिग्नलमुळेही कोंडीत भर पडत आहे. सिग्नलवर लाल दिवा लागल्यानंतर सर्व वाहने थांबत असल्याने वाहनांच्या रांगा वाढतात. मेरशी जंक्शन आणि पर्वरी उड्डाणपुलावरील वाहतुकीचा दररोज आढावा घेतला जात आहे, असेही शिरवईकर यांनी सांगितले.उड्डाणपुलाच्या कामामुळे वर्षभरापासून पर्वरी परिसरात वाहतूक कोंडी होत होती. उड्डाणपूल सुरू झाल्यानंतर ही समस्या कमी होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, उद्घाटनानंतर झालेल्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर पर्वरीकडील प्रवेश आणि निर्गमन मार्ग बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे मेरशी जंक्शनसह पणजीतही वाहतूक कोंडी होत आहे.
अतिवेग : ३७५ चालकांना चलन
पर्वरी उड्डाणपुलावर ताशी ६५ किमी वेगाची मर्यादा निश्चित केली आहे. ही मर्यादा ओलांडणाऱ्या ३७५ चालकांना चलनाच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत, अशी माहिती वाहतूक पोलिसांनी दिली.


