गणेश विसर्जनाचा फायदा घेऊन मेणकुरेत १५ लाखांची घरफोडी

मेणकुरे-डिचोली येथे गणेशोत्सवाच्या सातव्या दिवशी भरदिवसा बंद घर फोडून चोरांनी सुमारे १५ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने व इतर ऐवज लंपास केला. घरातील मंडळी घर बंद करून मूळ घरात गेले असता चोरांनी डाव साधला.


22nd September, 11:53 pm
गणेश विसर्जनाचा फायदा घेऊन मेणकुरेत १५ लाखांची घरफोडी

मेणकुरे येथील चोरीच्या पार्श्वभूमीवर पोलीस उपअधीक्षक गौरव यादव यांच्याशी चर्चा करताना आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये व ग्रामस्थ.
गोवन वार्ता। वार्ताहर
डिचोली
मेणकुरे-डिचोली येथे गणेशोत्सवाच्या सातव्या दिवशी भरदिवसा बंद घर फोडून चोरांनी सुमारे १५ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने व इतर ऐवज लंपास केला. घरातील मंडळी घर बंद करून मूळ घरात गेले असता चोरांनी डाव साधला. या प्रकरणामुळे मेणकुरे गावात भीतीचे वातावरण पसरल्याने डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये, मेणकुरे पंचायत मंडळाने डिचोली पोलीस उपअधीक्षक गौरव यादव यांची भेट घेऊन चोरांचा लवकर शोध घेण्याची मागणी केली.
चार महिन्यांत मेणकुरे गावात चोरीची दुसरी घटना घडल्याने खळबळ माजली आहे. सदर चोरीचा प्रकार मेणकुरे येथील रामदास नाईक यांच्या घरात मंगळवारी सकाळी ११ ते ११.३० या अर्ध्या तासातच घडला. रामदास नाईक यांच्या मूळ घरातील गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यासाठी घरातील सर्व सदस्य जुन्या घरात गेले होते. याचा फायदा उठवत चोरांनी घरात प्रवेश करून सोन्याचे दागिने व इतर ऐवज असा सुमारे १५ लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. घटनेची माहिती मिळताच डिचोली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला. चोरांचा माग काढण्यासाठी श्वानपथकाची मदत घेण्यात आली. गावात कामासाठी आलेल्या काही कामगारांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली. चोरीला तीन दिवस उलटूनही पोलिसांच्या हाती ठोस धागेदोरे लागले नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी आहे. चार महिन्यांत गावात चोरीची दुसरी घटना घडल्याने सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
चोरांना लवकर अटक करा : आमदार शेट्ये
डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी स्थानिक रहिवासी आणि पंचायत मंडळाच्या सदस्यांसह पोलीस उपअधीक्षक गौरव यादव यांची भेट घेऊन मेणकुरे येथील चोरीच्या घटनांबाबत तपासाची माहिती घेतली. मेणकुरे परिसरात रात्रीची गस्त वाढवा, परिसरात वास्तव्यास असलेल्या भाडेकरूंची पडताळणी करा, गणेशोत्सवाच्या काळात बाहेरून आलेल्या कामगारांची पडताळणी करा, आरोपींचा लवकरात लवकर शोध घेऊन त्यांना अटक करा, अशी मागणी यावेळी पोलिसांकडे करण्यात आली.

हेही वाचा
सर्व पहा