निशिन : हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला क्रिकेट संघाने आशियाई क्रीडा स्पर्धेतील आपले महिला टी-२०चे सुवर्णपदक कायम राखले. आयची-नागोया आशियाई क्रीडा स्पर्धेच्या मंगळवारी झालेल्या अंतिम सामन्यात भारताने श्रीलंकेचा तब्बल १४७ धावांनी पराभव करत सुवर्णपदकावर पुन्हा नाव कोरले. या विजयासह भारताने स्पर्धेतील आपल्या सुवर्णपदकाचे खातेही उघडले.
निशिन येथील कोरोगी स्पोर्ट्स पार्क मैदानावर झालेल्या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ३ गडी गमावून २१६ धावा केल्या. स्मृती मानधना, शेफाली वर्मा आणि रिचा घोष यांच्या आक्रमक फलंदाजीने भारताला मोठी धावसंख्या उभारून दिली. प्रत्युत्तरात श्रीलंकेचा डाव भारतीय फिरकी गोलंदाजांसमोर कोसळला आणि संपूर्ण संघ १५.४ षटकांत ६९ धावांवर बाद झाला. आशियाई क्रीडा स्पर्धेतील महिला क्रिकेटच्या इतिहासातील हा सर्वाधिक संघसंख्येचा विक्रम ठरला.
स्मृती-शेफालीची दमदार सलामी
भारताच्या डावाची सुरुवात स्मृती मानधना आणि शेफाली वर्माने आक्रमकपणे केली. दोघींनी पहिल्या विकेटसाठी ९९ धावांची भागीदारी करत श्रीलंकेच्या गोलंदाजांवर सुरुवातीपासूनच दबाव आणला. शेफालीने २९ चेंडूंत ४८ धावा करताना तीन चौकार आणि तीन षटकार ठोकले. अर्धशतकापासून ती अवघ्या दोन धावांनी दूर राहिली.
मानधनाने आपला आक्रमक फॉर्म कायम ठेवत ४५ चेंडूंत ७९ धावा केल्या. तिच्या खेळीत पाच चौकार आणि सात षटकारांचा समावेश होता. तिच्या या खेळीमुळे भारताची धावगती कायम राहिली. मानधना बाद झाल्यानंतर रिचा घोषने डावाची सूत्रे हाती घेतली.
रिचा घोषची तुफानी फटकेबाजी
विकेटकीपर फलंदाज रिचा घोषने अवघ्या २२ चेंडूंत नाबाद ४९ धावा करत भारताच्या डावाला वेगवान शेवट दिला. तिच्या खेळीत सहा चौकार आणि तीन षटकारांचा समावेश होता. रिचाच्या आक्रमक फलंदाजीमुळे भारताने २० षटकांत २१६ धावांचा टप्पा गाठला.
कर्णधार हरमनप्रीत कौरला मात्र मोठी खेळी करता आली नाही. ती १७ चेंडूंत १९ धावा करून बाद झाली. तरीही भारताने उभारलेली २१६ धावांची धावसंख्या श्रीलंकेसमोर मोठे आव्हान ठरली.
श्रीलंकेचा डाव ६९ धावांत आटोपला
२१७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेची सुरुवातच अडखळली. भारतीय गोलंदाजांनी सातत्याने विकेट घेत श्रीलंकेच्या फलंदाजांवर दबाव कायम ठेवला. कर्णधार चमारी अटापट्टूने सर्वाधिक २९ धावा केल्या. तिच्याशिवाय एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही.
टीम इंडियाची प्रभावी गोलंदाजी
भारताकडून दीप्ती शर्माने प्रभावी गोलंदाजी करत ३ बळी घेतले. शेफाली वर्मा, श्रेयांका पाटील आणि श्रीचरणी यांनी प्रत्येकी दोन बळी घेत श्रीलंकेचा डाव गुंडाळण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. श्रीलंकेचा संपूर्ण संघ १५.४ षटकांत ६९ धावांत बाद झाला.
कर्णधार हरमनप्रीत कौरने सुवर्णपदक कायम राखल्याबद्दल आनंद व्यक्त केला. संघाचे सुरुवातीपासूनचे लक्ष्य सुवर्णपदक जिंकणे आणि तिरंगा उंचावणे हेच होते, असे तिने सांगितले.
सलग दुसऱ्यांदा सुवर्ण
या विजयामुळे भारताने आशियाई क्रीडा स्पर्धेतील महिला क्रिकेटचे सुवर्णपदक सलग दुसऱ्यांदा पटकावले. २०२३च्या हांगझोऊ आशियाई क्रीडा स्पर्धेच्या अंतिम सामन्यातही भारताने श्रीलंकेला पराभूत करून सुवर्णपदक जिंकले होते. त्यामुळे यंदाच्या अंतिम सामन्यातील विजयाने भारताने आपले विजेतेपद कायम राखले.
राष्ट्रपतींकडून अभिनंदन
भारताच्या विजयाबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भारतीय महिला संघाचे अभिनंदन केले. या ऐतिहासिक विजयामुळे आयची-नागोया आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला पहिले सुवर्णपदक मिळाले असून, संघाची कामगिरी आणि सांघिक भावना देशातील युवा खेळाडूंसाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी नमूद केले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही भारतीय महिला क्रिकेट संघाचे अभिनंदन केले. संघाच्या कौशल्यपूर्ण आणि प्रभावी कामगिरीमुळे आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचे पहिले सुवर्णपदक मिळाल्याचे त्यांनी म्हटले.
संक्षिप्त धावफलक
भारत : २१६/३ (२० षटके) : स्मृती मानधना ७९, शेफाली वर्मा ४८, रिचा घोष नाबाद ४९.
श्रीलंका : सर्वबाद ६९ (१५.४ षटके) : चमारी अटापट्टू २९; दीप्ती शर्मा ३/६, शेफाली वर्मा २/३.
महिला टी-२० मध्ये एकाच वर्षांत
सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाज
- शेफाली वर्मा (भारत) : ८६३ धावा (२०२६)
- लॉरा वुल्फार्ट (दक्षिण आफ्रिका) : ८२४ धावा (२०२६)
- नताशा माइल्स (हाँगकाँग) : ८०० धावा (२०२६)
- इशा ओझा (यूएई) : ७७९ धावा (२०२५)
- यास्मीन दासवानी (हाँगकाँग) : ७७९ धावा (२०२६)
शेफाली वर्माचा नवा विक्रम
आशियाई क्रीडा स्पर्धेच्या अंतिम सामन्यात श्रीलंकेविरुद्ध ४८ धावांची दमदार खेळी करणाऱ्या शेफाली वर्माने महिलांच्या टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नवा विक्रम नोंदवला. शेफालीने यंदा आतापर्यंत ८६३ धावा केल्या असून, एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक टी-२० आंतरराष्ट्रीय धावा करणारी फलंदाज ठरली आहे. शेफालीने दक्षिण आफ्रिकेची फलंदाज लॉरा वुल्फार्टला मागे टाकले. वुल्फार्टने यापूर्वी एका वर्षात ८२४ धावा करण्याचा विक्रम नोंदवला होता. आशियाई क्रीडा स्पर्धेच्या अंतिम सामन्यातील ४८ धावांच्या खेळीमुळे शेफालीने हा विक्रम आपल्या नावावर केला आहे.
स्मृतीचा विश्वविक्रम;
११ हजार आंतरराष्ट्रीय धावा
भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मानधनाने आशियाई क्रीडा स्पर्धेच्या अंतिम सामन्यात श्रीलंकेविरुद्ध ऐतिहासिक विश्वविक्रम केला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ११ हजार धावा पूर्ण करणारी ती जगातील पहिली महिला क्रिकेटपटू ठरली. स्मृतीला ११ हजारांचा टप्पा गाठण्यासाठी केवळ १३ धावांची गरज होती. तिने अवघ्या १० चेंडूंत हा विक्रम आपल्या नावावर केला. पहिल्या चार षटकांत तीन षटकार आणि तीन चौकार लगावत तिने भारताला आक्रमक सुरुवात करून दिली. सामन्यात तिने ४५ चेंडूंत ७९ धावांची खेळी केली.


