आजमगड येथे इसमाचा बेछूट गोळीबार; आठ वर्षांच्या मुलासहीत पत्नी, दोन पुजाऱ्यांची हत्या

तिघा मुलांना ओलीस ठेवून खोलीत ७ तास डांबून घेतले; अखेर पोलिसांच्या गोळीबारात ठार : उत्तर प्रदेशातील आजमगड जिल्ह्यात धार्मिक विधीवरून झालेल्या वादाचे रुपांतर भीषण हत्याकांडात झाले. अहिरौला पोलीस ठाणे हद्दीतील शंभुगंज गावात एका व्यक्तीने पत्नी आणि दोन पुजाऱ्यांची गोळ्या झाडून हत्या केली. त्यानंतर त्याने आपल्या तीन मुलांना घरातील खोलीत कोंडून स्वतःला आत बंद करून घेतले. तब्बल सात तास चाललेल्या पोलिसांच्या प्रयत्नांनंतर अखेर कारवाई करण्यात आली. या कारवाईत आरोपी अरविंद सिंह (४०) ठार झाला. त्याचा आठ वर्षांचा मुलगा शौर्य याचाही गोळी लागल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाला. दोन मुलींना सुखरूप बाहेर काढण्यात आले.

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
10 mins ago
आजमगड येथे इसमाचा बेछूट गोळीबार; आठ वर्षांच्या मुलासहीत पत्नी, दोन पुजाऱ्यांची  हत्या

आजमगड : उत्तर प्रदेशातील आजमगड जिल्ह्यात धार्मिक विधीवरून झालेल्या वादाचे रुपांतर भीषण हत्याकांडात झाले. अहिरौला पोलीस ठाणे हद्दीतील शंभुगंज गावात एका व्यक्तीने पत्नी आणि दोन पुजाऱ्यांची गोळ्या झाडून हत्या केली. त्यानंतर त्याने आपल्या तीन मुलांना घरातील खोलीत कोंडून स्वतःला आत बंद करून घेतले. तब्बल सात तास चाललेल्या पोलिसांच्या प्रयत्नांनंतर अखेर कारवाई करण्यात आली. या कारवाईत आरोपी अरविंद सिंह (४०) ठार झाला. त्याचा आठ वर्षांचा मुलगा शौर्य याचाही गोळी लागल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाला. दोन मुलींना सुखरूप बाहेर काढण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, अरविंदची आई आणि पत्नीने त्याच्या मृत भावाच्या आत्म्याच्या शांतीसाठी घरात धार्मिक विधीचे आयोजन केले होते. अरविंदच्या आक्रमक वर्तनामुळे कुटुंबीय त्रस्त होते. त्याच्यावर धार्मिक विधी करण्यास तो आधीपासूनच नाराज होता.

मंगळवारी सायंकाळी सुमारे ६ वाजता अरविंद घरी परतल्यानंतर त्याने घरात पाच पुजारी उपस्थित असल्याचे पाहिले. त्याने पुजाऱ्यांकडे आधारकार्डची मागणी करत वाद घातला. पत्नी बाबिता (३२) हिने त्याला विरोध केल्यानंतर त्याने परवानाधारक रिव्हॉल्व्हरमधून तिच्यावर गोळी झाडली. त्यानंतर महेंद्र पाठक (६०) आणि अखिलेश मिश्रा (५०) या दोन पुजाऱ्यांवरही गोळीबार केला. या तिघांचा जागीच मृत्यू झाला. अन्य तीन पुजाऱ्यांनी घटनास्थळावरून पळ काढून आपला जीव वाचवला.

यानंतर अरविंदने आठ वर्षांचा मुलगा शौर्य, दहा वर्षांची मुलगी परी आणि ११ महिन्यांच्या सान्वीला खोलीत कोंडले. पोलिसांनी परिसराला घेराव घालत त्याच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. जिल्हाधिकारी रवींद्र कुमार, एसएसपी अनिल कुमार, डीआयजी सुनील कुमार सिंह आणि वाराणसी विभागाचे एडीजी नवीन अरोरा यांच्यासह वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. फॉरेन्सिक पथक आणि एटीएस कमांडोही तैनात करण्यात आले.

सुमारे सात तास पोलिसांनी अरविंदला शरण येण्याचे आवाहन केले. मात्र, त्याने पोलिसांना माघार घेण्यास सांगत सकाळपर्यंत थांबण्याचा आग्रह धरला. दरम्यान, खोलीतून गोळीबाराचा आवाज आला. अरविंदने मुलगा शौर्यवर गोळी झाडल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करण्याचा निर्णय घेतला.

एसओजीच्या पथकाने एसएसपी अनिल कुमार यांच्या नेतृत्वाखाली दरवाजा तोडून आत प्रवेश केला. यावेळी अरविंदने रिव्हॉल्व्हरमधील सर्व सहा गोळ्या पोलिसांच्या दिशेने झाडल्या. प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी गोळीबार केला. या कारवाईत अरविंद गंभीर जखमी झाला. पोलिसांनी तिन्ही मुलांना बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले.

शौर्यला गोळी लागल्याचे घटनास्थळीच आढळून आले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. परी आणि सान्वी यांना शारीरिक दुखापत झाली नसली तरी सात तास अन्न-पाण्याविना बंदिस्त राहिल्याने त्या मानसिक धक्क्यात होत्या. दोघींवर उपचार करण्यात आले.

दरम्यान, अरविंदलाही रुग्णालयात नेण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळावरून पुरावे गोळा केले असून सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. पुढील तपास सुरू आहे.

हेही वाचा
सर्व पहा