ग्रेटर नोएडा : एसीच्या स्फोटानंतर स्लीपर बसला भीषण आग; ९ जणांचा होरपळून मृत्यू

बसमध्ये ३५ प्रवाशांचा समावेश; यमुना एक्स्प्रेसवेवर स्लीपर पर्यटक बसला भीषण आग लागून ९ जणांचा होरपडून मृत्यू झाला. मृतांमध्ये एका महिलेचाही समावेश आहे. या दुर्घटनेत अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. बुधवारी रात्री उशिरा ही घटना घडली. बसमध्ये सुमारे ३५ प्रवासी असल्याची माहिती आहे.

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
8 mins ago
ग्रेटर नोएडा : एसीच्या स्फोटानंतर स्लीपर बसला भीषण आग; ९ जणांचा होरपळून मृत्यू

ग्रेटर नोएडा : यमुना एक्स्प्रेसवेवर स्लीपर पर्यटक बसला भीषण आग लागून ९ जणांचा होरपडून मृत्यू झाला. मृतांमध्ये एका महिलेचाही समावेश आहे. या दुर्घटनेत अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. बुधवारी रात्री उशिरा ही घटना घडली. बसमध्ये सुमारे ३५ प्रवासी असल्याची माहिती आहे.


पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, बसच्या एअर कंडिशनिंग (एसी) यंत्रणेत स्फोट झाल्यानंतर आग लागली. या आगीने इंजिनमधील वंगणाच्या तेलाला पेट घेतल्याने काही क्षणांतच संपूर्ण बस आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. शॉर्टसर्किटमुळे आग लागली असण्याची शक्यताही व्यक्त करण्यात आली असून, आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

ही बस नोएडाहून उत्तर प्रदेशातील महोबा येथे यमुना एक्स्प्रेसवेवरून जात होती. त्यावेळी बहुतांश प्रवासी झोपेत होते. अचानक बसला आग लागल्याने प्रवाशांमध्ये प्रचंड गोंधळ उडाला. जीव वाचवण्यासाठी काही प्रवाशांनी बसच्या खिडक्यांमधून उड्या मारून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला.

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि जेवर पोलिस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी बचावकार्य सुरू करून जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.

मृतांच्या कुटुंबीयांना २ लाखांची मदत

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दुर्घटनेची माहिती घेत मृतांच्या कुटुंबीयांप्रती शोक व्यक्त केला. जखमींना योग्य उपचार मिळावेत, तसेच पीडित कुटुंबीयांना आवश्यक ती सर्व मदत मिळावी, असे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी २ लाख रुपये, तर जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपये मदत जाहीर करण्यात आली आहे.

‘सगळीकडे धूरच धूर होता’

दुर्घटनेतून बचावलेल्या एका प्रवाशाने सांगितले की, तो झोपलेला असताना कोणीतरी बसचा दरवाजा ठोठावला. जागे झाल्यानंतर बसमध्ये मोठी गर्दी आणि धुराचे साम्राज्य असल्याचे दिसले. सामान किंवा पादत्राणे घेण्याचीही संधी मिळाली नाही. केवळ मोबाईल घेऊन बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. प्रवाशांची एकमेकांना धक्काबुक्की सुरू होती आणि बाहेर पडणे अत्यंत कठीण झाले होते.

बसच्या आत मोठ्या प्रमाणात धूर भरल्याने अनेकांना श्वास घेण्यास त्रास झाला. काही प्रवासी कसेबसे बाहेर पडले; मात्र मागे राहिलेल्या अनेकांना बाहेर पडण्याची संधी मिळाली नसल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. पोलीस आणि अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी आहे. बचाव व मदतकार्य सुरू आहे.

हेही वाचा
सर्व पहा