पणजी : मांडवी नदीच्या तीरावर बांधलेले जहाजाच्या आकाराचे कॅप्टन ऑफ पोर्ट्स टर्मिनल आणि त्याच्याशी संबंधित जेटी सुविधा ३० वर्षांसाठी खासगी संस्थेला देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. यासाठी कॅप्टन ऑफ पोर्ट्सने इच्छुक कंपन्यांकडून प्रस्ताव मागवले आहेत. दरम्यान, ही इमारत कॅसिनो लॉबीला देण्याचा डाव असल्याचा आरोप ‘पणजेकार अगेन्स्ट कॅसिनो’ या संघटनेने केला असून याविरोधात न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे.
या प्रस्तावानुसार, खासगी ऑपरेटर पणजी, जुने गोवा आणि बेती येथील सहा जेटींची व्यवस्था आपल्या हातात घेईल. याशिवाय कला अकादमी, महावीर गार्डन आणि परशुराम पुतळ्याजवळील तीन नवीन तरंगत्या जेटीसुद्धा या प्रकल्पात जोडण्यात आल्या आहेत. दिवजा सर्कलाजवळ एक नवीन तरंगती काँक्रिट जेटी, छोटे टर्मिनल आणि ‘याॅट’साठी डॉकिंग स्टेशन बांधण्याची योजना आहे.
महसुलासाठी ऑपरेटर दर एका वाहनामागे महिन्याला जास्तीत जास्त ३०,००० रुपयांपर्यंत शुल्क आकारू शकतो. प्रवाशांसाठी प्रवेश शुल्क जास्तीत जास्त २५ रुपये प्रति प्रवासी असेल आणि हा दर दर ३ वर्षांनी १५ टक्क्यांनी वाढवता येईल.
टेरेसवरील उपहारगृह, ॲम्फिथिएटर, कॅफेटेरिया आणि तिकीट काउंटर यांचा व्यावसायिक वापर करता येईल. सुरक्षेसाठी चेहऱ्याची ओळख पटवणारे एआय कॅमेरे लावावे लागतील आणि त्याचे रेकॉर्डिंग कमीत कमी ९० दिवस राखून ठेवावे लागेल; तसेच थेट सीसीटीव्ही फीड कॅप्टन ऑफ पोर्ट्सकडे द्यावे लागेल.
‘पणजेकार अगेन्स्ट कॅसिनो’चा विरोध
‘पणजेकार अगेन्स्ट कॅसिनो’ या संघटनेने ही टर्मिनल इमारत खाजगी संस्थेला देण्याबाबत तीव्र आक्षेप नोंदवला आहे. कॅसिनो लॉबीच्या सांगण्यावरूनच ही निविदा जारी करण्यात आली आहे. ही इमारत जमिनीवर नसून पाण्यात उभी आहे, त्यामुळे हरित लवादाने काही अटी घालून या इमारतीच्या उद्घाटनाला परवानगी दिली होती. परंतु ही निविदा लवादाच्या आदेशाचे उल्लंघन करते. जर ही निविदा तीन दिवसांच्या आत रद्द केली नाही, तर न्यायालयात आव्हान दिले जाईल, असा इशारा ‘पणजेकार अगेन्स्ट कॅसिनो’चे वाल्मिकी नाईक यांनी दिला आहे.


