गोवन वार्ता प्रतिनिधी
पणजी : धारगळ येथील २८,८२५ चौ. मीटर जमीन व्यवहार प्रकरणी बंगळुरू येथील कंपनीची ८ कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी कर्नाटक पोलिसांनी म्हापसाचे माजी नगरसेवक तारक आरोलकर याला अटक केली.
बंगळुरू येथील देवीरक्ष इस्टेट्स प्रा. लि. कंपनीचे प्रतिनिधी दर्शन एस. यांनी सदाशिवनगर पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्यानुसार, कंपनीला गोव्यात शिक्षण संस्था सुरू करण्यासाठी जमीन हवी होती. मार्च २०२३ मध्ये ओळखीच्या लोकांच्या माध्यमातून जमीन शोधत असताना योगेश नावाच्या व्यक्तीने धारगळ येथील सर्व्हे क्रमांक १७७/१ मधील २८,८२५ चौ. मीटर जागा दाखवली. ही जमीन तारक अारोलकर यांच्या मालकीची असल्याचे सांगून संशयितांनी १९ कोटी रुपयाने जमिनीचा सौदा ठरवला. सामंजस्य करार करण्यात आला. कंपनीकडून संशयितांनी सुमारे १९ कोटी रुपये घेतले. संशयितांनी जमिनीची नोंदणी केली नाही. शंका आल्यामुळे कंपनीने चौकशी केली असता, सदर जमीन अारोलकरने २० मार्च २०२० रोजी प्रेमचंद गोयल आणि २ ऑगस्ट २०२१ रोजी छवी गोयल यांच्या नावावर केल्याचे उघड झाले. त्यामुळे कंपनीने पैसे परत मागितले.
आरोलकरने २०२५ मध्ये कंपनीला तीन धनादेश दिले. पैकी दोन धनादेश बाऊन्स झाले. तिसरा चेक व्हॉईटनर लावून रद्द करण्याचा प्रयत्न केला गेला. कंपनीने संशयिताकडे संपर्क साधला असता, कंपनीची ८,१९,१३,०८० रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांत तक्रार करण्यात आली. सदाशिवनगर पोलिसांनी तारकसह योगेशच्या विरोधात गुन्हा नोंदवला. मंगळवारी न्यायालयीन कोठडीतून तारकला अटक करून सदाशिवनगर पोलीस घेऊन गेले.


