पणजी : पर्वरी येथील उड्डाणपुलावर वाढलेल्या वर्दळीमुळे गेल्या काही दिवसांपासून पर्वरी ते बांबोळी या मुख्य महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण होत होती. या गंभीर समस्येवर तात्पुरता तोडगा काढण्यासाठी आणि वाहतुकीचा वाढता ताण कमी करण्यासाठी प्रशासनाने आयआयटी नागपूरच्या तज्ज्ञांच्या शिफारशींनुसार नव्या वाहतूक व्यवस्थेची अंमलबजावणी सुरू केली आहे. या नव्या नियोजनानुसार मेरशी आणि पणजीच्या बाजूने अटल सेतूवरून पर्वरी तसेच म्हापशाच्या दिशेने जाणाऱ्या वाहनधारकांसाठी मॅजेस्टिक हॉटेलजवळ उड्डाणपुलाची एक लेन 'एक्झिट' म्हणून अधिकृतपणे खुली करण्यात आली आहे.
या नव्या वाहतूक व्यवस्थेनुसार अटल सेतूवरील उपलब्ध तीन लेनपैकी डाव्या बाजूची एक लेन केवळ पर्वरी शहरात आणि सर्व्हिस रोडवर प्रवेश करणाऱ्या वाहनांसाठी राखीव ठेवण्यात आली आहे. यामुळे मेरशी आणि पणजीकडून येणारी वाहने आता मुख्य महामार्गावरील गर्दीत न अडकता थेट पर्वरीच्या दिशेने खाली उतरू शकतील. परंतु, प्रशासनाने हे स्पष्ट केले आहे की ही व्यवस्था केवळ पर्वरीत उतरण्यासाठी (एक्झिट) मर्यादित ठेवण्यात आली आहे. पर्वरीतील सर्व्हिस रोडवरून अटल सेतूवर चढण्यासाठीचा प्रवेश मार्ग सुरक्षेच्या कारणास्तव अद्याप बंदच ठेवण्यात आला आहे. त्यामुळे पर्वरीतून पणजीच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना जुन्याच मार्गाचा वापर करावा लागणार आहे.
या नवीन तोडग्यामुळे मुख्य महामार्गावरील कोंडी काही प्रमाणात हलकी होण्यास मदत होणार असली, तरी उड्डाणपुलावरून वाहने वेगाने खाली उतरत असल्याने अपघातांचा मोठा धोका निर्माण झाला आहे. या सुरक्षेच्या आव्हानावर मात करण्यासाठी प्रशासनाने या एक्झिट पॉईंटवर रंबलर्स बसवले आहेत आणि बॅरिकेड्सच्या साहाय्याने हा मार्ग मुख्य वाहतुकीपासून वेगळा केला आहे. याशिवाय, वाहनधारकांना मार्गदर्शन करण्यासाठी आणि वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी वाहतूक पोलिसांची पथकेही त्या ठिकाणी तैनात करण्यात आली आहेत.
मात्र, एवढ्या उपाययोजनांनंतरही योग्य आणि स्पष्ट दिशादर्शक फलक (साइनबोर्ड्स) अद्याप न लावल्याने वाहनधारकांमध्ये अचानक मार्ग बदलताना गोंधळ निर्माण होत असल्याचे चित्र आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी किंवा वेगवान वाहतुकीदरम्यान अपघात रोखणे आणि वाहनधारकांना वेळेत योग्य लेन निवडायला लावणे हे वाहतूक पोलिसांसमोर मोठे आव्हान ठरणार आहे. येत्या सात दिवसांत या सर्व त्रुटी दूर करून दिशादर्शक फलक लावल्यानंतरच ही नवीन व्यवस्था अधिक सुरक्षित आणि प्रभावी ठरेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.


