कर्नाटकात बेहिशेबी मालमत्ता प्रकरणांमध्ये लोकायुक्ताची मोठी कारवाई; ३३ ठिकाणी छापे : सापडली २९ कोटींची मालमत्ता

८ सरकारी अधिकारी, निवृत्त अधिकाऱ्यांशी संबंधित मालमत्तांवर धाड; कर्नाटक लोकायुक्त पोलिसांनी बेहिशेबी मालमत्ता प्रकरणांमध्ये मोठी कारवाई करत सहा सरकारी अधिकारी आणि दोन निवृत्त अधिकाऱ्यांशी संबंधित तब्बल ३३ ठिकाणी एकाच वेळी छापे टाकले. बेंगळुरूसह चिक्कबळ्ळापूर, कलबुर्गी, दक्षिण बेंगळुरू, मंड्या, कोडगू, धारवाड आणि बिदर येथे करण्यात आलेल्या या कारवाईत तब्बल २९ कोटी रुपयांहून अधिक किमतीची मालमत्ता आढळून आली आहे.

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
just now
कर्नाटकात बेहिशेबी मालमत्ता प्रकरणांमध्ये लोकायुक्ताची मोठी कारवाई; ३३ ठिकाणी छापे : सापडली २९ कोटींची मालमत्ता

बेंगळुरू : कर्नाटक लोकायुक्त पोलिसांनी  बेहिशेबी मालमत्ता प्रकरणांमध्ये मोठी कारवाई करत सहा सरकारी अधिकारी आणि दोन निवृत्त अधिकाऱ्यांशी संबंधित तब्बल ३३ ठिकाणी एकाच वेळी छापे टाकले. बेंगळुरूसह चिक्कबळ्ळापूर, कलबुर्गी, दक्षिण बेंगळुरू, मंड्या, कोडगू, धारवाड आणि बिदर येथे करण्यात आलेल्या या कारवाईत तब्बल २९ कोटी रुपयांहून अधिक किमतीची मालमत्ता आढळून आली आहे. 

लोकायुक्ताच्या पथकांनी संबंधित अधिकाऱ्यांची घरे, कार्यालये तसेच त्यांच्या नातेवाईकांशी संबंधित ठिकाणांची झडती घेतली. या कारवाईत स्थावर मालमत्ता, वाहने, सोने-चांदीचे दागिने, रोक रक्कम,  मुदत ठेवी आणि इतर मौल्यवान वस्तूंची माहिती समोर आली. तपासात १७.९८ कोटी रुपयांची स्थावर आणि ११.६३ कोटी रुपयांची जंगम मालमत्ता आढळली.

बेंगळुरूच्या बसवनगुडी येथील जिल्हा निबंधक श्रीदेवी यांच्या प्रकरणात सुमारे ६.८१ कोटी रुपयांची मालमत्ता आढळली. त्यांच्याकडे सर्वाधिक किमतीची मालमत्ता असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

निवृत्त सहाय्यक अभियंता एच. एम. रंगनाथ यांच्या प्रकरणात सुमारे ५.७० कोटी रुपयांची एकूण मालमत्ता आढळली. यात रोकड, सोने-चांदीचे दागिने, वाहने आणि मुदत ठेवींसह सुमारे ३.९६ कोटी रुपयांच्या जंगम मालमत्तेचा समावेश आहे.

मंड्यातील मागासवर्गीय कल्याण विभागाचे वसतिगृह अधीक्षक शिवराज एम. यांच्याशी संबंधित ठिकाणी २.१६ कोटी रुपयांची स्थावर आणि १.६६ कोटी रुपयांची जंगम मालमत्ता आढळली. यात पाच भूखंड, पाच घरे, व्यावसायिक संकुल, फार्महाऊस आणि सहा एकर शेतीचा समावेश आहे. कलबुर्गी येथील राजेश्वरी बाबळद यांच्याशी संबंधित सुमारे २.२० कोटी, तर धारवाड येथील किरण बैंदूर यांच्याशी संबंधित सुमारे २.८० कोटी रुपयांची मालमत्ता आढळली.

पडताळणी सुरू 

या प्रकरणात जप्त केलेली कागदपत्रे आणि इतर साहित्याची तपासणी सुरू आहे. संबंधित अधिकाऱ्यांचे उत्पन्न, खर्च आणि मालमत्तेचे स्रोत यांची पडताळणी करण्यात येत असल्याचे लोकायुक्ताने सांगितले.

हेही वाचा
सर्व पहा