'सीएम स्कॉलरशिप योजनेचा' ३३ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना फायदा : मुख्यमंत्री डॉ. सावंत

'सेवा संकल्प अभियाना'निमित राज्यभरात विविध उपक्रम सुरू आहेत. आज मुख्यमंत्र्यांनी हॅकाथॉन, स्कॉलरशिप योजनेचा फायदा व युवा सहभागावर भाष्य केले; तसेच काँग्रेसच्या 'गोय राखण यात्रेवर' टीका करत भाजपच्या १५ वर्षांच्या विकासाचा दाखला दिला. आज या उपक्रमाचा उद्घाटन सोहळा लोकभवनात पार पडला.

Story: गोवन वार्ता | प्रतिनिधी |
just now
'सीएम स्कॉलरशिप योजनेचा' ३३ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना फायदा : मुख्यमंत्री डॉ. सावंत

पणजी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून राज्यभरात राबवल्या जाणाऱ्या 'सेवा संकल्प अभियाना'च्या अंतर्गत विविध लोककल्याणकारी उपक्रम आयोजित केले जात आहेत. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दोनापावला लोकभवनमधील जुवारी हॉलमध्ये गोव्यातील तरुणांसाठी शिक्षण, कौशल्य, तंत्रज्ञान आणि नवकल्पनांवर भर देणाऱ्या 'सेवा संकल्प अभियाना'चा प्रारंभ केला. या प्रसंगी अभियानाच्या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले असून, पुढील दोन महिन्यांत विविध कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे.


या कार्यक्रमादरम्यान व्हॉट्सॲपच्या माध्यमातून सरकारी सेवा पुरवण्यासाठी 'गोवा ऑनलाइन AI व्हॉट्सॲप चॅटबॉट' तसेच आयुर्वेद आणि संबंधित क्षेत्रांत तंत्रज्ञान आधारित उपायांना आणि नवकल्पनांना प्रोत्साहन देण्यासाठी 'आयुरहॅकाथॉन'चेही अनावरण करण्यात आले. या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी राज्यातील तरुणाई, शिक्षण क्षेत्र आणि गोव्याच्या शाश्वत विकासाच्या ध्येयावर सविस्तर भाष्य केले.

'संकल्प से सिद्धी' हॅकाथॉनद्वारे स्थानिक समस्यांवर तंत्रज्ञानाचे उपाय

युवांसाठी आयोजित 'संकल्प से सिद्धी' या हॅकाथॉन उपक्रमाबाबत माहिती देताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, 'गोवन प्रॉब्लेम्स, गोवन सोल्यूशन्स' या संकल्पनेवर आधारित हा कार्यक्रम राज्यातील महाविद्यालयांमध्ये पोहोचवला जात आहे. गोव्यातील स्थानिक समस्यांवर येथील विद्यार्थ्यांनीच तंत्रज्ञान आणि नाविन्यपूर्ण आयटी उपायांच्या माध्यमातून तोडगे शोधावेत, हा यामागील मुख्य उद्देश आहे. सात प्रमुख विषयांवर आधारित हे बूट कॅम्प ७० पेक्षा जास्त महाविद्यालयांमध्ये आयोजित केले जात असून, या माध्यमातून 'विकसित भारत २०४७' आणि 'विकसित गोवा २०३७' चे स्वप्न साकार होण्यास मदत होईल.

'सीएम स्कॉलरशिप योजनेचा' ३३ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना फायदा

शैक्षणिक मदतीबाबत बोलताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, गेल्या वर्षी 'मुख्यमंत्री स्कॉलरशिप योजने'साठी ३३,००० हून अधिक विद्यार्थ्यांचे अर्ज आले होते. विद्यार्थ्यांना लवकरात लवकर आणि वेळेवर मदत मिळावी, यासाठी प्रशासनाने अत्यंत गतीने काम करत शिष्यवृत्तीची रक्कम दोन महिन्यांच्या आतच थेट लाभार्थी विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली होती. यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक गरजा वेळेत पूर्ण करण्यास मोठी मदत झाली आहे.

काँग्रेसच्या 'गोंय राखण यात्रेवर' टीका आणि विकासाचा पुनरुच्चार

विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसच्या 'गोंय राखण यात्रे'बाबत बोलताना मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. भाजप सरकारच्या गेल्या १५ वर्षांच्या कार्यकाळात झालेल्या अष्टपैलू विकासाची तुलना काँग्रेसच्या राजवटीशी होऊ शकत नाही, असे सांगत त्यांनी काँग्रेसच्या काळातील डबल इंजिन सरकारने केवळ स्वतःचा विकास साधल्याचा आरोप केला. आज गोवा आर्थिक, आरोग्य, पर्यटन आणि शिक्षण अशा सर्वच क्षेत्रांत प्रगती करत असून, काल या यात्रेत गोमंतकीयांपेक्षा परप्रांतीयांचाच भरणा अधिक होता, असा दावाही त्यांनी केला.

महिला आणि तरुणांचा भाजप सरकारला ठाम पाठिंबा

राज्यातील महिला आणि युवा वर्ग सरकारच्या पाठीशी ठामपणे उभा असल्याचे सांगताना मुख्यमंत्र्यांनी 'नारी शक्ती महोत्सवा'चा उल्लेख केला. नुकत्याच पार पडलेल्या या महोत्सवात दोन हजारांहून अधिक महिला सहभागी झाल्या होत्या. त्यामुळे राज्यातील महिला वर्ग आणि महाविद्यालयांमधील तरुण भाजपच्या पाठीशी असून, विरोधकांकडून काढण्यात येणारी ही यात्रा केवळ एक राजकीय ढोंग असल्याचे सांगत त्यांनी विरोधी पक्षाच्या भूमिकेवर तीव्र आक्षेप घेतला.

हेही वाचा
सर्व पहा