कुडचडे : येथील जीसूडा मार्केटमधून अज्ञात चोरट्याने स्कूटरसह बॅगेतील मोबाईल, सोन्याचे मंगळसूत्र आणि रोख रक्कम मिळून सुमारे २ लाख ६८ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.
याप्रकरणी सिद्धेश सावर्डेकर यांनी कुडचडे पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार २० सप्टेंबर रोजी सकाळी १०.५५ ते ११ वाजण्याच्या दरम्यान त्यांनी टीव्हीएस ज्युपिटर स्कूटर जीसूडा मार्केटमध्ये पार्क केली होती. ही स्कूटर त्यांचे मेहुणे ओंकार गावकर यांच्या नावावर नोंदणीकृत आहे. अज्ञाताने पार्क केलेली स्कूटर चोरून नेली. स्कूटरमध्ये एक बॅग होती. त्यात सोन्याचे मंगळसूत्र, मोबाईल, ३ हजार रुपये रोख रक्कम होती.
स्कूटरसहीत सुमारे २.६८ लाख रुपयांचा ऐवजही चोरीला गेल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी कुडचडे पोलिसांनी अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. याप्रकरणी वरीष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कुडचडे पोलीस स्थानकाचे निरीक्षक दिनेश गावकर अधिक तपास करीत आहेत.


